खंडाळी : स्कूल बस आणि एसटी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये २२ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथे नेण्यात आले आहे. हा अपघात गंगाखेड- राणीसावरगाव रोडवरील खंडाळी गावाजवळ झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपळदरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंगाखेड शहरातील संत जनाबाई विद्यालयाची स्कूल बस विद्यार्थ्यांना घेऊन सहलीसाठी चाकूरकडे जात होती. गंगाखेड तालुक्यातील खंडाळी गावाजवळ स्कुल बस आली असता अहमदपूर वरून बुलढाण्याला जाणाऱ्या बस क्रमांक एमएच २०,२००६९ एसटी बसचा आणि स्कूल बसचा रविवारी सकाळी ९:४५ वाजता समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात स्कूल बसमधील विद्यार्थी आणि एसटी बसमधील २२ पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये महमूद शेख (६०, रा. अहमदपूर), राम मिलिंद गायकवाड (१०),श्याम राजाभाऊ कदम (२६ रा. पोखर्णी देवी),रत्नमाला उध्दव रेखावार (६०),उद्धव नारायणराव रेखावार (६५ रा. अहमदपूर), रामप्रसाद जोतिबा कोकाटे (१३), नारायण श्रीमंतराव गीते (५४), अश्विनी बालाजी कांगणे (२६), मीना नानाभाऊ जाधव (३५),सुजाता किशोर सोनवणे (२१), अनुराधा तुकाराम होळंबे (४४), छाया अशोक सोनुळे (४८), रेणुका श्रीनिवास गीते (३५), वेदांत महामुने (१२), शिवाजी महामुने (४२), वर्षा ज्योतिबा कोकाटे (३०), दिलीप रावसाहेब हाके (५५ रा. शिरनाळ ता. चाकुर), नंदा सत्यनारायण पुरोहित (५० रा. मेहकर), अनंता उद्धव सोनाळे (४०), कृष्णा अच्चुत दहिफळे (४५), सुर्वणा बहूरे (३१), अनुराधा बहूरे (४४ रा. सर्व गंगाखेड) हे २२ जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळतात पिंपळदरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये नेण्यात आले आहे. या ठिकाणी डॉक्टर व रुग्णालयाच्या परिचारिकांनी अपघातामध्ये जखमी झालेल्या जखमींवर उपचार केला. अपघातात जखमी झालेल्या सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथे नेण्यात आले आहे. अशी माहिती गंगाखेड उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. स्कूल बस आणि बसचा अपघात झाल्यानंतर एसटी बसचा चालक हा केबिनमध्ये अडकला होता. पिंपळदरी पोलिसांनी आणि नागरिकांनी शर्तीचे प्रयत्न करून चालकाला बाहेर काढले आहे. त्याला उपचारासाठी गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले. या अपघातामुळे एकच खळबळ उडाली आहे.