पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या (13.250 किमी लांबीचा) कामात आवश्यक भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात असून, महामार्गाच्या रुंदीकरणाला सुरुवात होणार आहे. हवेली प्रांताधिकार्यांच्या अखत्यारीत वडकी, फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील 13.66 हेक्टर क्षेत्र भूसंपादन करायचे असून, त्यातील 10.35 हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. उर्वरित 3.31 हेक्टर क्षेत्राचे काम अंतिम टप्प्यात आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या रुंदीकरणासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाअभावी काम करण्यास अडचणी येत होत्या. परंतु, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी चांदणी चौक प्रकल्पानंतर आपले लक्ष पालखी मार्गाच्या कामाकडे घातले. त्यामुळे रखडलेले भूसंपादन हवेली प्रांताधिकारी संजय अस्वले यांनी बाधित शेतकर्यांची चर्चा करून केले आहे. आतापर्यंत तीन टप्प्यात भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात आली.
हवेली तालुक्यातील वडकी येथील 7.79 हेक्टर क्षेत्र आवश्यक असून, त्यातील 6.29 हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आले आहे. या जमिनीचा मोबदला म्हणून 84 कोटी 87 लाख रुपये देण्यात आले आहेत. तर, उर्वरित 1.5 हेक्टर क्षेत्राच्या मूल्यांकनासाठी नगर रचना विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. फुरसुंगी येथील 3.59 हेक्टर क्षेत्र संपादित केले जात असून, त्यातील 2.1 हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन झाले आहे. त्याबदल्यात जमीन मालकांना 26 कोटी 26 लाख वितरित करण्यात आले आहेत. तसेच, उर्वरित क्षेत्राचे मूल्यांकन प्रस्तावित आहे. उरुळी देवाची येथील आवश्यक 2.68 हेक्टर क्षेत्रापैकी 2.01 क्षेत्राचे भूसंपादन पूर्ण झाले असून, त्यासाठी 19 कोटी 76 लाख रुपये मोबदला देण्यात आला आहे. तर, उर्वरित 0.63 क्षेत्राचे भूसंपादन पंधरा दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. भूसंपादनासाठी हवेली प्रांत कार्यालयाकडे 175 कोटी रुपये प्राप्त झाले असून, त्यातील 134 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.


