पुणे : मुलांना लहानपणापासून वाहतुकीचे नियम पाळण्याची सवय लागावी, यासाठी महापालिकेने साकारलेल्या चिल्ड्रन ट्रॅफिक पार्कला (वाहतूक उद्यान) विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पार्क सुरू केल्यानंतर तीन महिन्यांत तब्बल 3 हजार 695 विद्यार्थी, 274 शिक्षक आणि 156 पालकांनी भेट देऊन वाहतुकीच्या नियमांचे पाठ गिरवले आहेत. वाहतुकीचे विविध नियम काय आहेत, नियमांची चिन्हे, त्या चिन्हांचा उपयोग, अर्थ काय, अशा विविध प्रश्नांची उत्तरे लहान मुलांना होण्यासाठी महापालिकेच्या पथ विभागाने औंध येथील ब्रेमेन चौकात ट्रॅफिक पार्क साकारले आहे. लहान मुलांना सोप्या पद्धतीने नियम कळतील, अशा पद्धतीने या ठिकाणी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.
यामध्ये पहिल्या भागात, पहिल्या टप्प्यात रस्त्यावरील दुहेरी मार्गिका, सायकल मार्ग, पार्किंग व्यवस्था, चौक, स्वतंत्र सिग्नल, पादचारी क्रॉसिंग, तर दुसर्या भागात वाहतूक सुरक्षेसंदर्भातील माहिती चिन्हे, मराठी-इंग्रजीमध्ये माहिती, वाहतुकीसंबंधी 2 ते 3 मिनिटांचा माहितीपट आदींचा समावेश आहे. दरम्यान, हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यापासून सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या तीन महिन्यांत 4 हजार 125 जणांनी भेट दिली आहे. यामध्ये महापालिकेच्या 20, खासगी 11 आणि शासनाच्या 1 अशा 32 शाळांच्या
3 हजार 695 विद्यार्थी, 274 शिक्षक आणि 156 विद्यार्थ्यांच्या पालकांचा समावेश आहे.