बापू मुळीक: तालुका प्रतिनिधी पुरंदर सासवड ता. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, वाघीरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आयोजित बहि:शाल शिक्षण मंडळ आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोपाननगर सासवड यांच्या वतीने एक दिवसीय जेष्ठ नागरिक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेसाठी अनुक्रमे डॉ. वर्षा तोडमल, मा. दशरथ यादव, डॉ. श्रीराम गडकर, डॉ. संदीप सांगळे यांनी ‘सुखद जीवनसंध्या : कविता मनातली, ‘लोककलेतून लोकशिक्षण’, ‘संत गाडगेबाबा : जीवन आणि कार्य’ , ‘मराठी भाषेपुढील आव्हाने’ या विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.‘सुखद जीवनसंध्या:कविता मनातली’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. वर्षा तोडमल यांनी माणसाचे व्यक्तिमत्त्व कसे घडते व त्याचे टप्पे तसेच ध्यानाचे महत्त्व किती आहे याविषयी योग्य माहिती दिली.ज्येष्ठ नागरिकांच्या मनातील व्यथा मनाच्या सहाय्याने कशा दूर केल्या जाऊ शकतात हे सांगितले. मनाचे आरोग्य समृद्ध कसे करावे हे अनेक उदाहरणांच्या आधारे स्पष्ट केले. त्यासोबतच काही कवितांचे सादरीकरण त्यांनी केले.‘लोककलेतून लोकशिक्षण’ या विषयावर मार्गदर्शन करताना मा. दशरथ यादव म्हणाले, लोककला ह्या खर्या अर्थाने ज्येष्ठ नागरिकांनी जतन केलेल्या आहेत. काळाच्या ओघात अनेक लोककला नष्ट होत आहेत. खेड्यातील ह्या पारंपरिक लोककला जतन करून ठेवणे ही काळाची खरी गरज आहे. या माध्यमातून नवीन पिढीला लोककलेचे शिक्षण दिले गेले पाहिजे जेणेकरून या कौशल्याचा भविष्यात त्यांना फायदा होऊ शकेल. लोककला कोणकोणत्या आहेत व त्या का महत्त्वाच्या आहेत याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.‘संत गाडगेबाबा : जीवन आणि कार्य’ या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. प्रा. श्रीराम गडकर यांनी संत गाडगेबाबा यांचा जीवनप्रवास उलगडून दाखविला. साधे व्यक्तिमत्त्व देखील किती महान कार्य करू शकते हे संत गाडगेबाबा यांच्याकडे पाहून लक्षात येते आणि त्याचा अंगीकार आपण देखील जीवनात केला पाहिजे. संत गाडगेबाबा यांचे कार्य नवीन पिढीपर्यंत पोहचविण्याचे खरे काम ज्येष्ठ व्यक्तीच कृतीच्या माध्यमातून करू शकतात हे अनेक प्रसंगांच्या आधारे त्यांनी पटवून दिले.‘मराठी भाषेपुढील आव्हाने’ विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. संदीप सांगळे यांनी मराठी भाषेपध्ये सध्याच्या काळात कोणती आव्हाने आहेत याचा आढावा घेतला. मराठी भाषा ही ग्रामीण भातील ज्येष्ठ नागरिकांनीच बोली भाषेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जतन केलेली दिसते. काळाच्या ओघात ह्या बोली नष्ट होताना दिसत आहेत. नवीन इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे मराठी भाषेपासून नवीन पिढी लांब जाताना दिसत आहेत. ज्येष्ठ नागरिकांची ही जबाबदारी आहे की, नवीन पिढीपर्यंत ही भाषा कशी पोहचू शकेल तसेच त्यातील ज्ञान त्यांना कसे मिळेल याविषयी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत.कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. याप्रसंगी बाबूरावजी घोलप यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ समाजवादी विचारवंत महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे कार्यवाह मा.रावसाहेब अण्णा पवार होते.यावेळी म. सा. प. सोपानगर सासवड शाखेचे अध्यक्ष डॉ. नानासाहेब पवार, म. सा. प. सोपानगर सासवड शाखेचे सचिव मा.युसुब सय्यद,महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संपत जगदाळे, डॉ. सुभाष वाव्हळ, तसेच डॉ. सुभाष नप्ते, डॉ. विशाल पावसे, श्री विलास पवार, श्री हरिभाऊ कदम, महादेव लोहकरे, सौ.इंदिरा पवार, श्री.सिद्धिविनायक अत्रे, श्री.चंद्रकांत पवार श्री.सुरेश कोडीतकर, श्री.रमेश चव्हाण, सौ.भारती कोडीतकर, श्री .सुहास जगताप दिलीप भांबोरे आदी जेष्ठ नागरिक आणि महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. किरण गाढवे यांनी केले. तर डॉ. नानासाहेब पवार यांनी आभार मानले.