पुणे : महावितरणच्या वीजबिलांचा ‘ऑनलाइन’ भरणा करण्यामध्ये लघुदाब वर्गवारीतील वीजग्राहकांचा दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत आहे. गेल्या एप्रिल ते ऑक्टोबरपर्यंत पुणे परिमंडलातील दरमहा सरासरी १७ लाख 57 हजार ग्राहकांनी वीजबिलांपोटी 457 कोटी 18 लाख रुपयांचा वीजबिलांचा सुरक्षित व घरबसल्या ‘ऑनलाइन’ भरणा केला आहे. महावितरणकडून सर्व वर्गवारीतील ग्राहकांसाठी आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत सर्व प्रकारची ग्राहकसेवा एका क्लिकवर डिजिटल स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे. प्रामुख्याने बिल भरणा केंद्राच्या रांगेत उभे राहून, कार्यालयीन वेळेत वीजबिल भरण्याऐवजी ऑनलाईन द्वारे घरबसल्या व 24 तास वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध झाली आहे. यात प्रामुख्याने घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक व इतर लघुदाब ग्राहकांसाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट व मोबाईल अॅपची तसेच उच्चदाब ग्राहकांसाठी स्वतंत्र पोर्टलची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
गेल्या एप्रिल महिन्यापासून राज्यात पुणे परिमंडलातील वीजग्राहकांनी ऑनलाईन वीजबिल भरणा करण्यास प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. यामध्ये दरमहा सरासरी 17 लाख 57 हजार लघुदाब वीजग्राहकांकडून 457 कोटी 18 लाख रुपयांचा भरणा करण्यात येत आहे. तर नोव्हेंबरमध्ये आतापर्यंत 16 लाख 14 हजार लघुदाब वीजग्राहकांनी 420 कोटी 17 लाख रुपयांचा ‘ऑनलाइन’द्वारे भरणा केला आहे. महावितरणने लघुदाब वीजग्राहकांसाठी चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा ऑनलाईन भरणा करण्यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच मोबाईल अॅपचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. वीजग्राहकांना एकाच खात्यातून स्वतःच्या अनेक वीजजोडण्यांबाबत ही सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे वीजबिल भरणा केंद्रात जाऊन रांगेत उभे राहण्याऐवजी ऑनलाईन वीजबिल भरण्यास पसंती वाढलेली आहे.ऑनलाईन वीजबिल भरणा केल्यानंतर ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे लगेचच पोच देण्यात येत आहे. याशिवाय महावितरणच्या वेबसाईटवर व मोबाईल अॅपवर मागील वर्षभरातील मासिक बिलांचा तपशील व रक्कम भरल्याची देखील पावती उपलब्ध आहे. लघुदाब वीजग्राहकांसाठी क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड, युपीआय, भीम, इंटरनेट बॅकींग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बॅकिंगद्वारे वीजबिल भरणा केल्यास दरमहा 500 रुपयांच्या मर्यादेत 0.25 टक्के सूट देण्यात येत आहे. तसेच क्रेडीटकार्ड वगळता नेटबॅकिंग, डेबीटकार्ड, कॅशकार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून ऑनलाईन द्वारे होणारा वीजबिल भरणा आता निःशुल्क आहे. यासोबतच लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल 10 हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’ द्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी या ग्राहकांच्या वीजबिलांवर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देखील देण्यात येत आहे.