पुणे : बिबवेवाडी परिसरात दहशत निर्माण करणार्या सराईत टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. टोळीविरूद्ध ठार मारण्याचा प्रयत्न करणे, मालमत्तेचे नुकसान, पोलिसांचे आदेशाचा भंग करणे, जमाव जमवणे अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्कानुसार केलेली ही 110 वी कारवाई आहे. अनिल रमेश चव्हाण (वय 21, टोळी प्रमुख, ), राहुल ऊर्फ मॉन्टी सुनिल कुचेकर, (वय 20 रा. बिबवेवाडी) कैलास बाबुराव गायकवाड (वय – 21 रा. कोंढवा) राहुल अनिल उर्किडे (वय – 21, अपर बिबवेवाडी) चिम्या ऊर्फ प्रशांत भाऊसाहेब घाडगे (वय – 21 रा. अपर, बिबवेवाडी) धीरज गोपी ऊर्फ गोपाळ लामिचणे ऊर्फ लांबीछने ( वय – 22 रा.काकडे वस्ती, कोंढवा) रोहीत बोदरे याच्यासह दोन अल्पवयीनाविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे. सराईत चव्हाण टोळीने बिबवेवाडी परिसरात विविध गंभीर गुन्हे केले आहेत. प्रतिबंधक करवाई करुनदेखील त्यांनी पुन्हा गुन्हे केले. त्या पार्श्वभूमीवर टोळीविरूद्ध मोक्का कारवाई करण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगीता जाधव यांनी एसीपी पौर्णिमा तावरे, उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्यावतीने अपर आयुक्त नामदेव चव्हाण यांना प्रस्ताव पाठविला. त्यानुसार पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी टोळीविरूद्ध मोक्का कारवाई केली. दरम्यान, शहरातील कायदा सुव्यवस्था सुरळित ठेवण्यासाठी मोक्काचा बडगा कायम ठेवण्यात आला आहे.
पिस्तुल बाळगणार्याला विमानतळ पोलीसांची अटक केली. त्याच्याकडून पिस्तूलासह दोन जिंवत राउंड असा 50 हजारांचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. ही कारवाई खुळेवाडी कॉर्नर परिसरात करण्यात आली. संतोष शंकर गुंजाळ (वय – 26 रा. दगडी हौदाजवळ माळवाडी, हडपसर,पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. विमानतळ पोलिस हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना एकजण पिस्तूल बाळगून थांबल्याची माहिती पोलिस नाईक गिरीश नाणेकर आणि सचिन जाधव यांना मिळाली. त्यानुसार पथकाने खुळेवाडी परिसरात सापळा रचून संतोष गुंजाळ याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यत आली. ही कामगिरी पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे, एसीपी आरती बनसोडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे, पोलिस निरीक्षक मंगेश जगताप उपनिरीक्षक रविंद्र ढावरेख् अविनाश शेवाळे, सचिन कदम, सचिन जाधव, उमेश धेंडे, गिरिष नाणेकर, अंकुश जोगदंडे, नाना कर्चे, योगेश थोपटे, संजय आसवले यांनी केली.