नागपूर : बल्लारपूर रेल्वे स्थानकावर पादचारी पुलाचा भाग कोसळल्याने जवळपास 12 प्रवासी जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी राजुरा बसस्थानकाच्या छाताचा काही भाग कोसळल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. घटनेच्या वेळी बसस्थानकावर तुरळक प्रवासी असल्याने मोठी दुर्घटना टळली. सोमवारी सकाळी बसस्थानकाच्या मागच्या भागात असलेल्या वन विभागाच्या आवारातील झाडांच्या फांद्या कापण्याचे काम सुरू होते. दरम्यान निलगिरीचे झाड कापत असताना ते झाड बसस्थानकाच्या छतावर पडल्याने छताचा बराचसा भाग कोसळला. सकाळी 11 वाचताच्या सुमारास बसस्थानकावर विद्यार्थ्यांची गर्दी असते. मात्र घटनेच्या वेळी त्या भागात विशेष गर्दी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. तरीही पडणाऱ्या छताचा मलबा अंगावर निसटता कोसळून एक व्यक्ती किरकोळ जखमी झाली. ही व्यक्ती स्वतःच उपचारासाठी दवाखान्यात निघून गेली.
राजुरा बसस्थानक जीर्ण अवस्थेत आले असून बसस्थानकाच्या देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. फडणवीस सरकारच्या काळात तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार ह्यांनी बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे आदेश दिले होते. त्याच कालखंडात बसस्थानकाचे भूमीपूजन देखील करण्यात आले होते. मात्र सत्ता बदलानंतर बसस्थानकाच्या इमारतीचे काम ठप्प पडले आहे. पावसाळ्यात बसस्थानकाचे छत गळत होते. तसेच बसस्थानकावर पाणी साचून राहत होते. तरीही बसस्थानक प्रमुखांनी ह्याची दखल घेतली नसल्याचे या घटनेमुळे स्पष्ट झाले आहे. वास्तविक बघता वन विभागाने झाडे तोडण्यापूर्वी ह्याची माहिती बसस्थानक प्रमुख व आगार व्यवस्थापकांना देणे गरजेचे होते. मात्र वनविभागाने अशी कुठलीही सूचना दिली नसल्याचे कळते. वन विभागाने सूचना दिली असती तर प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेता आली असती. यामुळे प्रवाशांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. सुधीर मुनगंटीवार हे आता परत चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आहे. लवकर निर्णय घेऊन कामे मार्गी लावण्यासाठी ते ओळखले जातात. राजुरा बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे कामही मुनगंटीवार यांनी मार्गी लावावे अशी मागणी प्रवाशांकडून होते आहे.