नगर : महापालिकेने धोरण निश्चित केलेले नसतानाही शहरातील रस्त्यांवर ‘पे अँड पार्क’ योजनेसाठी निविदा मागविण्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी करत काही नगरसेवकांनी शुक्रवारी झालेल्या महासभेत अजेंड्यावर विषय नसतानाही त्याला मंजुरी मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी विषय आर्थिक बाबीशी निगडीत असल्याने धोरण न ठरवता निविदा प्रक्रिया राबवता येणार नाही, असे स्पष्ट केले. दरम्यान, ‘पे अँड पार्क’साठी मनपाने खासगी संस्थेमार्फत सर्वेक्षण करून अहवालही तयार केल्याचे व याबाबत बहुतांशी नगरसेवक अनभिज्ञ असल्याचेही समोर आले आहे. महापौर रोहिणी शेंडगे, आयुक्त जावळे, उपमहापौर गणेश भोसले यांच्या उपस्थितीत मनपाची महासभा झाली. यात अचानक विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, स्वप्निल शिंदे, डॉ. सागर बोरुडे यांनी शहरातील रस्त्यांवर पे अँड पार्क योजना राबवण्यासाठी निविदा काढा, अशी मागणी केली. याबाबतचा प्रस्ताव महासभेत का घेण्यात आला नाही, असा जाबही त्यांनी विचारला. जल अभियंता परिमल निकम यांनी या विषयाची माहिती दिली. शहरातील रस्त्यांवर पे अँड पार्क योजना राबवण्यासाठी खाजगी संस्थेच्या सर्वेक्षणातून प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे, त्याचा प्रस्ताव महासभेपुढे सादर केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
मात्र काही नगरसेवकांनी मनपाने धोरण ठरवलेले नसतानाही निविदा प्रक्रिया तयार करता येईल का? याबाबत आयुक्तांकडे स्पष्टीकरण मागितले. त्यावर आयुक्त जावळे यांनी ही बाब आर्थिकतेशी निगडित असल्याने धोरण न ठरवता, निकष न ठरवता निविदा काढणे योग्य होणार नाही. त्यासाठी सर्वंकष धोरण निश्चित करावी लागेल, असे स्पष्ट केले. पुढील महासभेत निविदा सादर करण्याचे अट टाकून निविदा प्रक्रिया राबवण्यास सुरुवात करा, असा हट्ट या नगरसेवकांनी केला. मात्र, त्यास प्रशासनाने विरोध केला. त्यावर बारस्कर यांनी तातडीने महासभा आयोजित करण्याची मागणी केली. उपमहापौर भोसले यांनी दहा ते बारा दिवसात पुढील महासभा आयोजित केली जाईल, असे सांगितले. पुढील महासभेत हा विषय सादर न झाल्यास सभा चालू देणार नाही, असा इशारा बारस्कर यांनी दिला. शिंदे – फडणवीस सरकारने स्थगिती दिली नगरसेवकांनी शहरातील रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल प्रशासनाला धारेवर धरले. भाजपचे महेंद्र गंधे यांनी शहरातील एकही रस्ता धड नाही, रस्त्यांची लाज वाटते, अशी खंत व्यक्त केली. एखादी गरोदर महिला नगरच्या रस्त्यावरून गेली तर तिची प्रसूती होईल, अधिकाऱ्यांनी व्हाट्सअप व इंस्टाग्रामवरील प्रतिक्रिया पहाव्यात त्यातून नागरिकांचा रोष लक्षात येईल, याकडे लक्ष वेधले. संपत बारस्कर यांनीही रस्त्यांच्या परिस्थितीकडे लक्ष वेधले. त्यावर उपमहापौर भोसले यांनी पूर्वीच्या सरकारने शहरातील रस्त्यांसाठी निधी मंजूर केला होता, मात्र नवीन आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने या कामांना स्थगिती दिली, आता नगरसेवक अनिल शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे प्रयत्न करून निधी मंजूर करून आणावा, अशी सूचना केली. पाण्याच्या टाकीत नागरिक कपडे धुतात ॲड. राजू कातोरे यांनी नागापूरमधील चव्हाण रुग्णालयामागील फेज-२ योजनेतील पाण्याच्या टाकीला झाकण नसल्यामुळे काही नागरिक त्यामध्ये कपडे धुतात, आंघोळी करतात, तेच पाणी पिण्यासाठी सोडले जाते, याकडे लक्ष वेधले. मदन आढाव यांनीही त्यास दुजोरा दिला. अभियंता रोहिदास सातपुते यांनी आठ दिवसात झाकण बसवू असे सांगताच आढाव यांनी झाकण वाचवण्यासाठी आठ दिवस कशासाठी लागतात असा प्रश्न उपस्थित केल्यावर सातपुते यांनी लवकरच झाकण बसू असे उत्तर दिले.