नाशिक : मुख्यमंत्री शिंदे आणि आमच्यावर टीका करताना खरे तर उध्दव ठाकरे आणि त्यांच्या गटाने आत्मपरिक्षण करायला हवे. ठाकरेंना पश्चाताप होत असेल. वेळीच सर्व लक्षात आले असते तर एवढी वाईट वेळ त्यांच्यावर आली नसती. रश्मीताईंना (रश्मी ठाकरे) मुख्यमंत्री करा, असे सांगणारा मीच होतो. पण मी छोटा कार्यकर्ता पडलो. त्यासाठी त्यांना शरद पवार आणि सोनिया गांधी यांची अनुमती आवश्यक होती, असा आरोप कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला. अडीच वर्षात ठाकरे हे मंत्रालयात केवळ चारवेळा गेले. जनतेची कामे मार्गी लागली नाहीत. मंत्री असूनही आम्ही त्यांना कधीच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर पाहिले नाही. तुम्ही काय बघणार, असा प्रतिप्रश्नही सत्तार यांनी केला. नाशिक येथील कृषीथॉन प्रदर्शनाला ना. सत्तार यांनी हजेरी लावली. त्याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
नाशिक येथील कृषी प्रदर्शनाला येणे निश्चित होते. त्यामुळेच मी गुवाहाटीला जाऊ शकलो नाही. मी अजिबात नाराज नाही. आमचा मुख्यमंत्र्यांवर पूर्णपणे विश्वास आहे. आणि आमच सगळ चांगल सुरू असल्याचा दावा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे. ते म्हणाले, कामाख्या देवीला जाण्यासाठी आजचाच दिवस आहे असे नाही. मी नंतर कधीतरी जाईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र गेल्यासारखेच आहे. मुख्यमंत्र्यांच्या मनगटात एवढा जोर आहे की, ते दुसऱ्याला भविष्य विचारण्यासाठी हात दाखवणार नसल्याचे सांगत ना. सत्तार यांनी नाराजीचे वृत्त फेटाळून लावले. मंत्रिमडळ विस्तार टप्याटप्प्याने होत असतो. त्यादृष्टीने मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराची यादी तयार केली असून, लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगितले. बाळासाहेबांची शिवसेनेच्या (शिंदे गट) गुवाहाटी दौऱ्यात काही आमदार जाणार नसल्याची चर्चा सुरू होती. त्यानुसार चंद्रकांत पाटील, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, महेंद्र दळवी, संजय गायकवाड आणि खासदार श्रीरंग बारणे यांचा त्यात समावेश असून, काहीजण नाराज असल्याची चर्चा आहे. मतदार संघातील पूर्वनियोजित कामांमुळे गुवाहाटीला जाणार नसल्याचे संबंधितांनी स्पष्ट केले आहे. त्यापैकीच नाशिक दौऱ्यावर आलेले ना. सत्तार यांनी मात्र, या सर्वच शक्यता फेटाळून लावत येणाऱ्या काळात मुख्यमंत्र्यांचा हात कसा आहे हे सर्वांनाच कळेलच, असा इशाराही विरोधकांना दिला.