अकोला : महापालिकेच्या अतिक्रमण हटाव धडक मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी २३ नाेव्हेंबरला गांधी चौकातील चौपाटी आणि जैन मंदिर परिसरात अतिक्रमण हटवताना लघु व्यावसायिकांनी अतिक्रमण हटाव पथकातील कर्मचाऱ्यांसोबत झोंबा-झोंबी केली. त्यामुळे मोहीमेदरम्यान काही वेळ तणाव निर्माण झाला होता. मात्र सुदैवाने हा तणाव निवळला. दरम्यान महापालिकेच्या पथकाने गांधी चौक-फतेह चौक -सुभाष चाैक या मार्गातील रहदारीत अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणाचा सफाया केला. रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या बैठकीत शहरातील मुख्य मार्गावर झालेल्या अतिक्रमणावर चर्चा झाली. यामुळे होणारे परिणाम लक्षात घेवून जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी महापालिकेला अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार सोमवारी २१ नोव्हेंबरपासून अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येत आहे. सोमवारी शहर कोतवाली चौक-टिळक रोड, अकोट फैल या मार्गावरील तर मंगळवारी खुले नाट्यगृह चौक-फतेह चौक-दीपक चौक-दामले चौक-रेल्वे मालधक्का या मार्गावर ही मोहीम राबवण्यात आली. आतापर्यंत सुरू होती. मात्र बुधवारी मोहीमेदरम्यान पथकातील कर्मचाऱ्यांसोबत अतिक्रमण धारकांनी झोंबा-झोंबी झाली.
रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमण राबवण्याची सूचना केली. या बैठकीला पोलिस अधिकारीही उपस्थित होते. या सुचनेची अंमलबजावणी महापालिका प्रशासनाने केली. मात्र संवेदनशिल भागात मोहिम राबवत असताना देखिल पथकाला पोलिस संरक्षण देण्यात आले नाही. त्यामुळे पोलिस संरक्षणा विनाच पथकाने ही मोहीम राबवली. रस्त्यावर चारचाकी गाडी लावून व्यवसाय करणाऱ्यांनी पथक आल्यानंतर आपल्या चारचाकी गाड्या जैन मंदिर गल्लीत ठेवल्या. मात्र पथक गल्लीत पोहाेचले. पथकातील कर्मचाऱ्यांनी १२ हातगाड्या हातांनी ओढून आणल्या. या १२ चारचाकी गाड्यांचा जेसीबीने चुराडा करण्यात आला. अतिक्रमण हटाव मोहिमेच्या चौैथ्या दिवशी गुरुवारी मुख्य पोस्ट ऑफिस ते सिव्हिल लाइन चौक ते सुधीर कॉलनी या मार्गावर अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येणार आहे.


