औरंगाबाद : भरधाव ट्रक आणि दुचाकीच्या भीषण अपघातात तिघेजण ठार झाल्याची घटना आज सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास वाळूज एमआयडीसी येथे घडली. येथील एनआरबी बेअरिंग कंपनीच्या समोरील चौकात हा अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील दोन बहिणी व एका भावाचा जागीच मृत्यू झाला. दिपक लोखंडे (वय 20), अनिता लोखंडे (वय 22) आणि निकिता लोखंडे ( वय 18), अशी मृतांची नावे आहेत. ते रांजणगाव येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. रांजणगाव, कमळापूर येथील आसाराम बापूनगरात राहणाऱ्या अनिता कचरू लोखंडे (वय 22) व निकिता कचरू लोखंडे (वय 18) या दोघी बहिणी वाळूज औद्योगिक परिसरातील रेणुका ऑटो इंड्ट्रीज या कंपनीमध्ये कामाला आहे. त्यांना कामावर सोडण्याचे काम भाऊ दीपक कचरू लोखंडे करतात. नेहमीप्रमाणे आजही सकाळी सात वाजेच्या सुमारास तो दोघा बहिणींना घेऊन निघाला होता.
वाळूज एमआयडीसीत नियमितणे सकाळची पहिली शिफ्ट सुरू होण्याची घाई असल्याने कंपनीत जाण्यासाठी कामगारांची लगबग सुरू होती. याचदरम्यान, रांजणगाव फाट्यावरून पुढे येताच त्यांच्या दुचाकीला ट्रकचा धक्का लागून तिघेही ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून जागीच ठार झाले. ही घटना मॅन डिझेल कंपनीच्या समोरील मुख्य मार्गावर घडली. घटनेनंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. घटनेनंतर अर्ध्या तासाने स्थानिक व वाहतूक शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिघांना रुग्ण घाटी रुग्णालयात रवाना केले. त्यानंतर वाहतूक कोंडी सुरळीत केली.