महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : येथील सुमठाणा वस्तीतील सेंट ॲनेस शाळेसमोर असलेल्या पार्किंग व्यवस्थेमुळे मोहबाळा गावातील नागरिक त्रस्त झाले असून ही पार्किंग व्यवस्था हटविण्यात यावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे मोहबाळावासीयांनी भद्रावती नगर परिषद व पोलिस स्टेशन यांच्याकडे नुकतीच केली आहे. प्राप्त माहितीनुसार मोहबाळा येथील ग्रामस्थांना दररोज काही कामानिमित्त भद्रावती येथे जाणे-येणे करावे लागते. त्यांच्या रस्त्यावरच सेंट ॲनेस ही शाळा आहे. शिवाय रस्ताही अरुंद आहे. तरीदेखील शाळेसमोर रस्त्यावर अनेक वाहने उभी केलेली असतात. या वाहनांमुळे मोहबाळाकडे जाणा-या आणि सुमठाणाकडे येणाऱ्या वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. तसेच या ठिकाणी तयार करण्यात आलेले गतीरोधक परवानगी न घेताच तयार करण्यात आले असा आरोपही या ग्रामस्थांनी केला आहे. पार्किंग व्यवस्थेमुळे होणा-या त्रासाबद्दल शाळेच्या प्राचार्या यांना सूचना दिली. परंतु त्यांनी याबाबीकडे दुर्लक्ष केले आहे. शेवटी मोहबाळा गट ग्राम पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी नगर परिषद आणि पोलिस स्टेशन यांना निवेदन सादर करुन ही समस्या दूर करण्याची मागणी केली. निवेदन सादर करताना मोहबाळाच्या सरपंच सुनंदा वाघ, राहुल वाघ, तुलशीदास मिलमिले, संदीप खरे, प्रकाश रामटेके, श्रावण वांढरे उपस्थित होते.


