नागपूर : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समितीतर्फे आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी दीक्षाभूमीवर बुधवारी देशभरातून भीमसागर उसळला होता. या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित होते. याप्रसंगी दीक्षाभूमीच्या १९० कोटींंच्या नव्या विकास आराखड्यास १५ दिवसांत मंजुरी देऊ, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. भगवान गौतम बुद्धांचा विचार जागतिक स्तरावर स्वीकारला गेला आहे. त्यांचे विचार पुस्तकात न राहता कृतीत येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समितीतर्फे आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा दीक्षाभूमीवर बुधवारी उत्साहात पार पडला. या वेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, त्यांच्या पत्नी सीमा आठवले, कमलताई गवई, स्मारक समितीचे अध्यक्ष डाॅ. राजेंद्र गवई, समितीचे सचिव सुधीर फुलझेले आदी उपस्थित होते. आगामी काळात समाजात समता व बंधुत्व टिकवण्याकरिता संविधानासोबत गौतम बुद्धांचा धम्म आणि विचारही तेवढाच महत्त्वाचा आहे. त्यांचे विचार पुस्तकात न राहता कृतीत येण्याची गरज आहे. बुद्धांच्या विचारात जगाच्या कल्याणाची प्रेरणा आहे, असे गडकरी म्हणाले. बाबासाहेबांच्या कार्याची तुलना फक्त मार्टिन ल्यूथर किंग यांच्या कार्याशी करता येईल. संविधान विशेषज्ञ असण्यासोबत बाबासाहेब अर्थतज्ज्ञ होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश आत्मनिर्भर होण्यासाठी सामाजिक आर्थिक विकासाचा कार्यक्रम हाती घेतल्याचे सांगितले. जागेच्या प्रश्नाबाबत बराचसा फाॅलोअप केला. जुन्या काळात आज जागा मिळाल्यानंतर आम्ही पुन्हा नवीन जागा मागणार नाही, असे समितीने लिहून दिले आहे. त्यामुळे जागेबाबत आजच काही स्पष्ट आश्वासन देता येणार नाही, असे गडकरींनी स्पष्ट केले. याप्रसंगी दीक्षाभूमीला “अ’ वर्गाचा दर्जा देण्याचा पाठपुरावा केंद्राकडे करू, असे सांगून पुढील १५ दिवसांत दीक्षाभूमी विकासाच्या १९० कोटींच्या नव्या आराखड्याला मंजुरी मिळेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अनुयायांची वाढती संख्या लक्षात घेता दीक्षाभूमीलगतच्या शासकीय कार्यालयांच्या जागा दीक्षाभूमीला देण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. इंदू मिलची जागा एक रुपया न घेता दिली. लंडनमध्ये डाॅ. आंबेडकरांचे घर विक्रीला निघाले होते. ते युती सरकारने िवकत घेतले. जपानमध्ये कोयासान विद्यापीठात आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण केले, असे फडणवीस म्हणाले.