चंचल पितांबरवाले
शहर प्रतिनिधी अकोट
अकोट : बाजार समितीला इ-नाम योजनेअंतर्गत प्राप्त इलेक्ट्रॉनिक्स उपकरणाचा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात येऊन अकोट पोलिसांचे कोठडीत असलेल्या बाजार समिती सचिवाला एक दिवसीय पोलीस कोठडी नंतर पुन्हा तीन ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश अकोट न्यायालयाने दिले आहेत.या सुनावणी वेळी बाजार समिती पडताळणी करिता योग्य ते दस्तावेज पुरवित नसल्याचा युक्तिवाद आरोपीचे वकिलांनी केला असून चौकशीमध्ये आरोपी पूर्ण माहिती देत नसल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले. अकोट बाजार समितीला इनाम योजनेअंतर्गत संगणक, लॅपटॉप, टॅब, वजन काटे आधी साहित्य शासनाद्वारे पुरविण्यात आले होते. परंतु बाजार समिती मुख्य प्रशासक गजानन पुंडकर यांनी या साहित्याचा आढावा घेतला असता त्यातील बरेच साहित्य गहाळ असल्याचे आढळून आल्याने त्यांनी केलेल्या तक्रारीवरून तत्कालीन बाजार समिती सचिव यांना आकोट पोलिसांनी अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसीय पोलीस कोठडी सुनावली होती.ही मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी आरोपीचे वकिलांनी गहाळ असलेले संगणक, टॅब, लॅपटॉप कुठे, कुठे ठेवण्यात आले याची माहिती न्यायालयाला दिली. काही वजन काटे मात्र निकामी झाल्याने त्यांची लिलावाद्वारे भंगारात विक्री केल्याचे सांगण्यात आले.मात्र, त्याबाबत घेण्यात आलेला ठराव, लिलाव करण्याबाबत दिलेली जाहिरात, बोली बोलणाऱ्यांची नावे इत्यादी बाबत कोणतेही दस्तावेज बाजार समितीत उपलब्ध नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यावर सर्व दस्तावेज बाजार समिती कार्यालयात असून बाजार समिती प्रशासक ती चौकशी कामी पुरवित नसल्याचे आरोपींचे वकिलांनी म्हटले.त्यानंतर आरोपी गुन्हा मान्य करीत नसून योग्य माहिती देत नसल्याने जप्ती कामात अडथळे येत असल्याचे सरकारी वकील यांनी सांगितले. आरोपीचे वकील, सरकारी वकील व पोलीस यांचे म्हणणे ऐकून अखेरीस अकोट न्यायालयाने आरोपीचे पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे.