मकरंद जाधव
तालुका प्रतिनिधी श्रीवर्धन
श्रीवर्धन : तालुक्यातील बोर्लीपंचतन येथे अखंड आगरी समाज व प्राथमिक आरोग्य केंद्र बोर्लीपंचतन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.२ आॕक्टोबर रोजी अखंड आगरी समाज सभागृहात महीला आरोग्य मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे.यात शारीरिक आजारांसोबत मानसिक आजारांचेही वाढलेले प्रमाण ही चिंताजनक बाब आहे. स्रियांना परमेश्वराने अफाट शक्ती व सहनशीलता दिलेली आहे पण खरंच, महिला किती कष्ट करतात आणि त्याहीपेक्षा किती त्रास सहन करतात हे सर्वसामान्य माणसाच्या ताकदीच्याही पलीकडचे आहे. घरातली कामे,बाहेरची कामे आणि त्याबरोबरच भावनिक व मानसीक चढउतार ह्या सर्वांचा महिलांच्या प्रकृतीवर वाईट परिणाम होतच असतो. महीला त्याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे स्रीयांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते.महीलांनी आपल्या आरोग्याबाबत जागृत राहून आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य चांगले रहावे यादृष्टीने आरोग्य मार्गदर्शन शिबीराच्या माध्यमातून महीलांना होणारे विविध आजार व समस्या त्यावर योग्य उपचार व आहार अशा विविध विषयांवर बोर्लीपंचतन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरज तडवी,बोर्लीपंचतन येथील सेवाभावी व्यक्तीमत्व डॉ.राजेश पाचारकर, आरोग्य सेवक संजय हासपाटील यांनी योग्य ते मार्गदर्शन केले.त्याच बरोबर किशोरवयीन मुलींच्या मासीक पाळीबाबतचे अज्ञान व त्याबाबत उद्भवणाऱ्या समस्या यावर आरोग्य सेविका सुजाता धनावडे पाटील व आदि परीचारीका आकांक्षा मयेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित महीलांची रक्त तपासणीही करण्यात आली व त्यांना फाॕलीक अॕसीडच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी बोर्लीपंचतन प्राथमिक आरोग्य केद्राच्या आरोग्य सेवीका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ उमेश केळसकर,कर्मचारी, अखंड आगरी समाज अध्यक्ष वैभव पाटील,उपाध्यक्ष संतोष कांबळे,महीला अध्यक्षा भूमी कांबळे,विष्णू धुमाळ,गणेश पाटील, शरद पाटील, समाजाचे विविध पदाधिकारी, समाजबांधव व महीला उपस्थित होत्या.