मकरंद जाधव
तालुका प्रतिनिधी श्रीवर्धन
अलिबाग : येथील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ.राजेंद्र चांदोरकर यांच्या डॉ.राज प्रॉडक्शन्स बॅनर निर्मित “बाबाची सोनपरी” या लघु चित्रफित गीताला शुक्रवार दि.३० सप्टेंबर रोजी पुणे येथील राष्ट्रीय फिल्म संग्रहालयात पार पडलेल्या मुंबा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिध्द अभिनेते विक्रम गोखले व मोहन आगाशे यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.यापुर्वी २४ जूलै रोजी औरंगाबाद येथे झालेल्या रोशनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये याच चित्रफितीला प्रथम क्रमांकाच्या पारीतोषिकाने गौरवण्यात आले होते.या चित्रफितीमध्ये एका सर्व सामान्य पित्याने आपल्या कन्येला प्रतिकूल परिस्थितीत अभ्यासाबरोबरच क्रिडा प्रकारातील धावण्यामध्ये नैपुण्य मिळविण्यासाठी केलेली धडपड तर कन्येने पित्यासाठी केलेला त्याग व त्याचबरोबर त्यांचं एकमेकांविषयी असलेलं संवेदनशील नातं डॉ.राजेंद्र चांदोरकर व त्यांची कन्या कु.संवेदना चांदोरकर यांनी आपल्या सुंदर अभिनयातून साकारलं आहे.पिता व कन्या यांचं नातं हळुवारपणे उलगडणारे,प्रत्येक कन्या व पित्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू आणणारे यातील गीत स्वतः डॉ.राजेंद्र चांदोरकर यांनी गायलं असून गीतरचना व संगीत मनिष अनसुरकर, चित्रीकरण सुनीत गुरव, रेकॉर्डिंग वरुण भगत,संकलन विशाल गायकवाड तर दिग्दर्शन सचिन कांबळे यांनी केलं आहे.भारतात आणि प्रामुख्याने पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात लघुपट संस्कृती विकसित व्हावी, आशयसंपन्न लघुपटाच्या माध्यमातून दैनंदिन जगण्यातील अनेक समस्या अधिक प्रकर्षांने लोकांपुढे याव्यात या विचाराने आयोजन करण्यात आलेल्या या महोत्सवात सामाजिक जनजागृती शॉर्ट फिल्म (सोशल अवेरनेस), आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म (विदेशी फिल्म), अॕनिमेशनपट,कल्पनारम्य (फिक्शन) फिल्म, जाहिरातपट(अॕडफिल्म), संगीतपट(म्युझिक व्हिडियो) आणि माहितीपट(डॉक्युमेंटरी) अशा लघुपटांच्या वर्गवारी करण्यात आल्या होत्या. यावर्षीच्या महोत्सवात देश विदेशातून ७०० हुन अधिक लघुपटांनी सहभाग नोंदविला. यामधून ७० लघुपट दाखवले गेले.दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात सिनेसृष्टीतील भूत-वर्तमान-भविष्य काळातील महत्वपूर्ण विषयसंबंधित विविध कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचा सिने रसीकांनी आनंद लुटला. महोत्सवाचे आयोजक व संस्थापक अध्यक्ष जय भोसले,संयोजक व चित्रपट दिग्दर्शक रामकुमार शेडगे, व्यवस्थापकिय संचालक अभिषेक अवचार,कार्यकारी संचालक अर्जून अजित यांच्यासह मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिध्द अभिनेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.अलिबागच्या सोनपरीने पटकावलेल्या प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारामुळे अलिबागचे नाव पुन्हा सातासमुद्रापार पोहचवणाऱ्या डॉ.राज प्रोडक्शन्सच्या टिमचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.