जितेंद्र लखोटीया
ग्रामीण प्रतिनिधी, हिवरखेड
तेल्हारा : तालुक्यामध्ये गेल्या चार-पाच दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे तर कुठे कुठे ढगफुटी सदृश्य पाऊस पडत असल्यामुळे अनेक भागातील पिके पाण्याखाली गेली असून शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाचा जोर असाच काही दिवस कायम राहिल्यास निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास फिरवून घेतल्या जात असल्याने बळीराजा चिंतेत सापडला. त्यामुळे नुकसानग्रस्त भागाचा शासनाने तातडीने सर्वे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.तेल्हारा तालुक्या मध्ये यावर्षी कपाशी, सोयाबीन, तूर आधी पिकांची परिस्थिती समाधानकारक असताना तालुक्यातील बहुतांश भागांमध्ये गत चार-पाच दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून ढगफुटी सदृश्य पाऊस पडत असल्यामुळे भांबेरी खापरखेड, नेर ,दापुरा, मनात्री,आरसुळ, पंचगव्हाण या भागातील बहुतांश पिके पाण्याखाली गेल्यामुळे पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
यामध्ये कपाशी, सोयाबीन, तूर आधी पिकांचे मोठे नुकसान झाले असून काही पिकांचे नुकसान होत आहे. तर तालुक्यातील सौंदळा, कारला, दानापूर, वारी, वारखेड,हिवरखेड या भागांमध्ये सुद्धा पावसाचा जोर कायम असल्यामुळे कपाशीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास कपाशीचे बोंडे सडू शकतात व बोंड अळीचा प्रादुर्भाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच तेल्हारा परिसरातील इतर भागांमध्ये सुद्धा सतत पाऊस येत असल्यामुळे सोयाबीन,कपाशी या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून दररोज येत असलेल्या जोरदार पावसामुळे परिसरातील सर्वच शेत पीके धोक्यात आल्यामुळे बळीराजा चिंतेत सापडला असल्याने अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्यामुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी शासनाने त्वरित करावी अशी मागणी होत आहे.