महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : येथील ठेंगे प्लाॅट परिसरात असलेल्या जिवनज्योती दिव्यांग औद्योगिक निवासी कर्म शाळेची मान्यता तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी विकास संघटनेचे अध्यक्ष राहुल सोनटक्के यांनी पत्रपरिषदेत केली. राहुल सोनटक्के यांनी पत्रपरिषदेत सांगितले की, सन २००२ पासून भद्रावती शहरात जिवनज्योती दिव्यांग औद्योगिक निवासी कर्म शाळा अस्तित्वात आहे. या कर्म शाळेत २० कर्मचारी विविध पदांवर कार्यरत होते. या कर्मचाऱ्यांनी सन २०१७ पर्यंत आपली सेवा दिली. त्या बदल्यात त्यांना कोणत्याही प्रकारचे वेतन देण्यात आले नाही. दरम्यान, दि. ८ एप्रिल २०१५ रोजी शाळेला ५० टक्के अनुदान मिळाले. त्यानंतर सर्व जुन्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले व बोगस दस्तावेज तयार करून नवीन नोकर भरती केली. असा आरोप राहुल सोनटक्के यांनी पत्रपरिषदेत केला. याबाबत माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता देण्यात आली नाही. म्हणून वरिष्ठांकडे अपील केली असता सुनावणी झाली. या २० कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्याकडे दि. १० जून, ६ सप्टेंबर आणि १३ सप्टेंबर २०२२ रोजी निवेदने सादर करुन काहीच दखल घेण्यात आली नाही. विशेष म्हणजे दि.६ व १३ सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनात दि.१४ सप्टेंबर रोजी सामुहीक आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला होता. असेही पत्रपरिषदेत सांगण्यात
आले.पत्रपरिषदेला जिवन पथाडे, अमोल पेटकर, हरीश लांडगे, चंद्रकांत बन्नागरे, विजय खापने, प्रशांत कठाणे, भिमराव शिवगडे, प्रशांत थुटे, प्रकाश रामटेके, सतीश जथाडे, पालिका डोंगरे, कुलदीप डाखरे, नरेश पुणेकर उपस्थित होते. दरम्यान, या संदर्भात जिवन ज्योती दिव्यांग औद्योगिक निवासी कर्म शाळेचे प्राचार्य प्रतीक व्यवहारे यांच्याशी संपर्क साधला असता हा विषय संस्थेशी संबंधित असून याबाबत संस्थाच योग्य तो निर्णय घेईल, असे सांगितले.











