मकरंद जाधव
तालुका प्रतिनिधी श्रीवर्धन
श्रीवर्धन : तालुक्यातील दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी आपल्या पोलीस पथकाद्वारे मंगळवार दि.१३ सप्टेंबर रोजी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडवली,दिवेआगर, बोर्लीपंचतन या परीसरातील अवैध हातभट्टी दारु धंद्यावर धडक कारवाई करीत दारु भट्ट्या उध्वस्त करुन संबधीतांवर गुन्हे दाखल केले.
पोलीसांच्या या धडक कारवाईमुळे हातभट्टी चालक व गावठी दारु विक्रेत्यांसह अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहेत.या हातभट्टी दारुमुळे परिसरातील अनेक गावातील तरुण पीढीसुध्दा दारुच्या आहारी गेली आहे दारुमुळे कित्येकांचे संसार उध्वस्त होत असल्याने वडवली गावातील महिला व ग्रामस्थांनी या अवैध दारु धंद्याविरुध्द कंबर कसली असून गावातील महिलांनी दारुबंदीबाबत आपल्या भावना लेखी निवेदनातून व्यक्त करीत पोलीसांना याबाबत कारवाई करण्याची विनंती केली होती.दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी यापूढे आपल्या परीसरात अवैधपणे गावठी दारुचे धंदे करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले असून त्यावर त्वरीत कारवाईला सूरुवात केली असून कुठे अवैध धंद्याची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क करावा असे आवाहन केले आहे.पोलीस प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे महीला वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.