मकरंद जाधव
तालुका प्रतिनिधी श्रीवर्धन
श्रीवर्धन : केंद्र शासनाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभियानातंर्गत प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२२ या योजनेत शेतकऱ्यांना त्यांच्या विम्याची पावती घरपोच देणारा “माझी पॉलिसी माझ्या हातात” हा उपक्रम रायगड जिल्ह्यामध्ये ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड मार्फत राबविण्यात येत आहे.
गुरुवार दि.८ सप्टेंबर रोजी या उपक्रमाचे उद्घाटन आमदार महेश बालदी,जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर,निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले.
दर वर्षी नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते.अतिवृष्टी, गारपीट,अवकाळी पाऊस आदि नैसर्गिक आपत्तीमुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांची अपरिमीत हानी होते.अशा संकटातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरु केली आहे.ही योजना सर्व शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक योजना आहे.कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकरी त्यांच्या इच्छेनुसार यामध्ये सहभागी होऊ शकतात.जिल्ह्यात भात व नाचणी ही दोन पिके प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप २०२२ अंतर्गत अधिसूचित आहेत.भात पिकासाठी विमा हप्ता रक्कम १ हजार ३५ रुपये २० पैसे प्रति हेक्टर असून विमा संरक्षित रक्कम ५१ हजार ७६० रुपये प्रति हेक्टर इतकी आहे. तर नाचणी पिकासाठी विमा हप्ता रक्कम ४०० रुपये प्रति हेक्टर असून विमा संरक्षित रक्कम २० हजार रुपये प्रति हेक्टर इतकी आहे. खरीप हंगाम २०२२ जिल्ह्यामध्ये एकूण ७ हजार ८७१ शेतकऱ्यांनी पिक विमा उतरविला आहे.यापैकी बँकेमार्फत विमा पॉलिसी घेतलेल्या कर्जदार दोन हजार २८३ शेतकरी यांना विमा पॅलिसी वाटप करण्यात येत आहे.या कार्यक्रमाप्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखडे, कृषी पर्यवेक्षक मोहन सूर्यवंशी,ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीचे जिल्हा समन्वयक शरद कबाडे व तालुका समन्वयक वैभव घरत उपस्थित होते.


