महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : शेतात काम करीत असताना वीज पडून महिला ठार होण्याची घटना आज दि.१ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास तालुक्यातील कोंढा शेत शिवारात घडली.वर्षा ओंकार मंगाम (३४) रा. कोंढा असे मृत महिलेचे नाव आहे. ती आपल्या पतीसोबत शेतात शेतीचे काम करीत होती. दरम्यान, दुपारी भद्रावती तालुक्यात पावसाने अचानक हजेरी लावली. त्यात वीज कोसळून वर्षाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची भद्रावती पोलिसांना माहिती देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. मृत महिलेच्या पश्चात पती, सासरे, सासू, दोन मुली व मुलगा असा आप्त परिवार आहे. वर्षाच्या मृत्यूने संपूर्ण कोंढा गावात शोककळा पसरली आहे.