शकील खान
शहर प्रतिनिधी अकोला
शिक्षण विभागाअंतर्गत मान्यता प्राप्त खाजगी अनुदानीत, विनाअनुदानीत, अंशत: अनुदानीत शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे तक्रारीकरीता जिल्हास्तरावर ‘संवाद दिन’ राबविण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्याकरीता जिल्हा परिषदचे शिक्षणाधिकारी(माध्यमिक) यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक महिण्याच्या दुसऱ्या सोमवारी दुपारच्या सत्रात ‘संवाद दिन’ राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदचे शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ. सुचिता पाटेकर यांनी दिली.
शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्हा, विभाग व राज्यस्तरावरील कर्मचाऱ्यांचे तक्रारी निवारण करण्याकरीता ‘संवाद दिन’ राबविण्याचे निर्देश दिले आहे. त्याअनुषंगाने संबधितांनी तक्रार या कार्यालयाचे ई-मेल eosecakolasanwaddin@gmail.com वर पाठवावी. तक्रार किंवा निवेदन हे वैयक्तीक स्वरुपाची असावी. तिनही स्तरांवरील संवाद दिनाकरिता अर्जदारांने अर्ज विहित नमुन्यात किमान 15 दिवस आधी दोन प्रतींत पाठविणे आवश्यक राहिल. जिल्हास्तरावरील संवाद दिनानंतर एक महिन्याने विभागीय स्तरावरील संवाद दिनात अर्ज करावा. विभाग स्तरावरील संवाद दिनानंतर दोन महिन्यांनी राज्यस्तरावरील संवाद दिनात अर्ज करता येईल. अधिक माहितीकरीता शिक्षणाधिकारी माध्यमिक, जिल्हा परिषद अकोला येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदचे शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांनी केले आहे.