अमरावती : अमरनाथच्या पवित्र गुहेजवळ ढगफुटीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली असून अचानक संपूर्ण पर्वतीय भागात परिस्थिती विपरीत आणि भीषण बनली आहे. पवित्र गुहेत बाबा बर्फानी यांचे दर्शन घेऊन परतत असलेले अमरनाथ यात्रेच्या मार्गावर अकोल्याच्या शेजारील अकोट तालुक्याचे २९ जण अडकले असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या सर्व २९ प्रवाशांना अमरनाथ गुहेच्या मार्गावर रामबन आणि चंद्रकोट परिसरात उभारण्यात आलेल्या सीआरपीएफ कॅम्पमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात येताच त्यांना सुखरूप परत पाठवले जाईल. सध्या प्रभारी विभागीय आयुक्त पवनीत कौर तसेच अकोला जिल्हा आणि अकोट तहसील प्रशासन अमरनाथ श्राइन बोर्डाच्या संपर्कात असून अकोटचे डीडीएमओ शब्दे यांनी सर्व प्रवाशांच्या सुरक्षेची पुष्टी केली आहे.