अविनाश पोहरे
ब्युरो चिफ अकोला
“व्हिजन ग्रीन अकोला” ही अकोलेकरांनी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाची नवीन मोहीम सुरू केली आहे. राजर्षी शाहू महाराज जयंती च्या निमित्ताने रविवार दि.२६ जून २०२२ रोजी जे.आर.डी टाटा स्कूल जवळील खुल्या जागेवर वृक्षारोपण करण्यात आले. “व्हिजन ग्रीन अकोला” या मोहिमेच्या माध्यमातून अकोला हिरवे करण्याचा मानस यावेळी टीमने व्यक्त केला. झाडं फक्त लावायची नाही तर झाडांचं पूर्ण संगोपन झालं पाहिजे म्हणून ज्या ठिकाणी जबाबदारी घेणारी लोकं असतील अशाच ठिकाणी झाडं लावायची आणि ती जगवायची हे टीम “व्हिजन ग्रीन अकोला” यांचा विचार आहे. मागील काही वर्षांपासून अकोल्याचे तापमान प्रत्येक वर्षी वाढत चालले आहे. अकोला जगातील सगळ्यात उष्ण शहर म्हणून ओळखल्या जात आहे. जसजसे उन्हाळ्यात तापमान वाढत आहे त्याच पद्धतीने मुसळधार पावसाचे प्रमाणही वाढत आहे, शेतकऱ्यांसाठी- निसर्गासाठी आवश्यक असलेला संततधार पाऊस आज काल येत नाही. धो-धो पाऊस कोसळतो आणि त्यामुळे जमिनी वाहून जातात, पुरासारखी सारखी परिस्थिती निर्माण होते. गरिबांची घरं वाहून जातात. निसर्गाची ही उलटी चक्र फिरण्या मागे कारण ठरते ग्लोबल वार्मिंग आणि दिवसेंदिवस कमी होत चाललेला ग्रीन कव्हर. ही समस्या दूर करण्यासाठी अकोलेकरांनी एकत्र येऊन “व्हिजन ग्रीन अकोला” ही मोहीम सुरू केली. या मोहिमे अंतर्गत शास्त्रीय अभ्यास करून स्थानिक प्रजातीची झाड लावायची आहेत असे ठरवूनच आज च्या पहिल्या मोहिमेचे नियोजन करण्यात आले. २६ जून रोजी जेआरडी टाटा स्कूल, खडकी जवळच्या ७००० स्क्वेअर फुट खुल्याजागेत सकाळी ७ वाजता वृक्षारोपण करण्यात आले. वन विभागातील रोपे आणणे, त्यासाठी मेहनत घेणे वाहतूक पुरवणे, खड्डा करणे ही सगळी कामे टीमने श्रमदानातून केली. तरुण मंडळींनी विजन ग्रीन अकोला साठी चे पोस्टर हाताने तयार केले. या मोहिमेत सामील झालेल्या लोकांची प्रतिक्रिया म्हणजे ही तर फक्त सुरुवात आहे अजून तर पूर्ण अकोला हिरवेगार करणे बाकी आहे असे मत व्यक्त केले. अव्यवस्थित नियोजनामुळे विकासकामांच्या नावावर झाडे तोडली जातात आणि त्या मोबदल्यात नवीन झाडे लावल्या जात नाहीत. निसर्गाची ही नासधुस थांबून अकोला हिरवे करण्यासाठी सर्व अकोलेकरांना आवाहन करते की त्यांनी सुद्धा या मोहिमेत सहभागी व्हावे. आपल्या घराच्या आजूबाजूला खुली जागा असल्यास तिथे वृक्षारोपण मोहीम आपण सोबतीने राबवू. स्वतःच्या घरासमोर एक तरी स्थानिक प्रजाती चे झाड लावावे आणि ते कशाच्याही नावावर तोडू देऊ नये. हरित अकोला अभियान अधिकाधीक गतीमान करण्यासाठी संपर्कात येणाऱ्या तज्ञ, अभ्यासु, अधिकारी, अनुभवी मार्गदर्शकांनी… “व्हिजन ग्रीन अकोला थिंक टॅंक ” मध्ये सामील व्हावे. तसेच पैसे नको फक्त शक्य असल्यास जागा, रोपे, ट्री-गार्ड उपलब्ध करण्यासाठी सहकार्य करावे. वृक्षारोपण प्रभावीपणे राबविण्याकरिता जणसामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक इत्यादी क्षेत्रातील मंडळींनी तसेच जनतेने पुढे यावे. विविध क्षेत्रातील मंडळींच्या सल्ल्यानुसार नियोजनबद्ध कार्य “व्हिजन ग्रीन अकोला” यांनी आपल्या हाती घेतले आहे. करिता विजन ग्रीन अकोला सर्व अकोलेकरांना आवाहन करते की आपल्याकडून होईल तशा पद्धतीने या मोहिमेत सर्वांनी साथ द्यावी. आज तरुण पिढीला पुढे येणे गरजेचे आहे.


