किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातूर : महाराष्ट्रासह अकोला जिल्ह्यातील तहसील कार्यालयात काम करणाऱ्या कोतवालांना चतुर्थ श्रेणीत शिपाई म्हणून पदोन्नती देवून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा अशा प्रकारची मागणी पातुर तालुका विकास मंचाने मागच्या वर्षी तहसील कार्यालय पातुर मार्फत महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कडे निवेदनाद्वारे केली होती. त्या अनुषंगाने पातुर तालुका विकास मंचाचे संयोजक ठा.शिवकुमारसिंह बायस यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची मुंबई मंत्रालयात प्रत्यक्ष भेट घेऊन याविषयी सविस्तर चर्चा करून त्यांची बाजू योग्य प्रकारे मांडून आपली महत्वाची भूमिका बजावली होती.सरकारने पातुर तालुका विकास मंचच्या मागणीला योग्य न्याय व सकारात्मक प्रतिसाद देत महाराष्ट्रातील तहसील कार्यालयात मानधनावर काम करणा-या कोतवालांना त्याच कार्यालयात आता शिपाई पदावर बढती द्यायला सुरुवात केली आहे.अकोला विभागातील विविध तहसील कार्यालयात काम करणाऱ्या १२ कोतवालांना त्यापैकी पातुर येथे तहसील कार्यालयात दोन कोतवालांना चतुर्थ श्रेणीत शिपाई या पदावर पदोन्नती मिळाली आहे. सविस्तर वृत्त असे की पातुर तालुका विकास मंचाचे सक्रिय पदाधिकारी म्हणून विजय राऊत यांची ओळख आहे.त्यांचे वडील स्व.किसनराव राऊत यांनी संपुर्ण आयुष्य अगदी शेवटच्या श्वासापर्यंत पातुर तहसील कार्यालयात कोतवाल म्हणून खर्ची घातले.एका कोतवालाच्या अडीअडचणी काय असू शकतात हे फक्त त्यांच्या कुटुंबीयांनाच माहिती असतात.विजय राऊत यांनी याबाबत पातुर तालुका विकास मंचाचे संयोजक ठा.शिवकुमारसिंह बायस यांना अवगत केले व त्यांच्या वडिलांना आलेल्या अडचणी आताच्या कोतवालांना येवू नये त्यांना मिळणा-या तुटपुंज्या मानधनावर त्यांचे कुटुंबीय जगूच शकत नाही यासाठी त्यांना आपल्या माध्यमातून काय न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करता येतील ते करावे अशी इच्छा व्यक्त केली.त्यावर पातुर तालुका विकास मंचानी पातुर तहसील कार्यालयात कार्यरत असणारे कोतवाल यांच्याशी चर्चा करून त्यांना शासन दरबारी चतुर्थ श्रेणीत शिपाई पदावर पदोन्नती मिळवून देण्यासाठी संबंधित विभागाला निवेदनाद्वारे मागणी करून त्याचा वेळोवेळी योग्य पाठपुरावा केला व पातुर सह महाराष्ट्रातील हजारो कोतवालांना त्यांचा हक्क मिळवून देण्यात ऐतिहासिक यश प्राप्त केले.
ठा.शिवकुमारसिंह बायस प्रतिनिधीशी बोलतांना म्हटले की महागाईने होरपळून निघालेल्या आपल्या देशात प्रत्येक घटकातील सामान्य माणूस खूप अडचणीत सापडला आहे.प्रत्येक माणूस तारेवरच्या कसरती प्रमाणे आपले व आपल्या कुटुंबातील लोकांचे उदरनिर्वाह करीत आहे.निसर्गाची वक्र दृष्टी पडलेल्या शेतकरी वर्गावर सतत टांगती तलवार असल्याचे चित्र आहे.अशा शेतक-यांचे मुलं तसेच सामान्य कुटुंबातील हातमजुरी करणारे नागरिक कोतवाल म्हणून तहसील कार्यालयात काम करत आहेत.त्यांना खुप कमी मानधन असते या तुटपुंज्या मानधनात त्यांच्या कुटूंबियांना पोटाची खळगी निट भरता येत नाही तसेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाचा भार उचलता येत नाही या सर्व बाबींचा विचार लक्षात घेता शासनाने त्यांना शिपाई पदावर पदोन्नती देण्यासाठी घेतलेला निर्णय खुप महत्वपूर्ण आणी स्वागतार्ह आहे.