महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : येथील स्कार्पिअंझ डान्स अकॅडमीच्या ९ कलाकारांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड करण्यात आली असून ते सप्टेंबर किंवा आक्टोबर महिन्यात पार पडणा-या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार असल्याची माहिती स्कार्पिअंझ डान्स अकॅडमीचे कोरिओग्राफर सागर मामिडवार यांनी पत्रपरिषदेत दिली. पत्रपरिषदेत मामिडवार यांनी सांगितले की, दि.८ जून २०२२ रोजी अखिल नटराजन आंतर सांस्कृतिक संघ नागपूरच्या वतीने गोवा येथे राष्ट्रीय नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ‘हीप-अप’ नृत्य प्रकारात संपूर्ण भारतातून ३९ समूह सहभागी झाले होते. त्यात भद्रावती येथील स्कार्पिअंझ डान्स अकॅडमीचा समूह प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. या ९ कलाकारांच्या समुहामध्ये मृगया खोब्रागडे, आर्शना घोरपडे, भार्गवी वाभिटकर, दिव्यानी पाचभाई, आरोही शिंदे, यशस्वी गाडगे, अवनी बन्सोड, स्वरा ढुमणे, ॠची नखाते यांचा समावेश आहे. प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल समुहाला सुवर्ण पदक, आकर्षक ट्राफी व सर्वांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सन २००७ मध्ये सुरू झालेल्या या अकॅडमीमध्ये सध्या ५० ते ६० विद्यार्थी नृत्याचे धडे घेत आहेत. यापूर्वीही या अकॅडमीच्या कलाकारांनी इंडियाज गाट टॅलेंट, सोनी टीव्ही शो, झी टीव्ही शो, २०-२० डान्स स्पर्धा इत्यादी स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. त्यात एका स्पर्धेत तृतीय क्रमांकही पटकाविला होता, असेही मामिडवार यांनी पत्रपरिषदेत सांगितले.