अमरावती, दि. २ : मराठी नववर्ष व गुढीपाडव्याचा सण यंदा कोरोनामुक्तीची पहाट घेऊन आला आहे. कोरोना रूग्णांमध्ये व पॉझिटिव्हिटी दरात लक्षणीय घट झाल्याने सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत. हे नववर्ष सर्वांना निरामय आरोग्य, सुखसमृद्धी देवो, अशा शब्दांत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी जिल्ह्यातील समस्त नागरिकांना गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
गुढीपाडव्यानिमित्त पालकमंत्र्यांनी आज आपल्या निवासस्थानी गुढीचे पूजन केले. यावेळी त्यांचे कुटुंबिय व विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्र्यांनी समस्त नागरिकांना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या की, कोरोनाचा नायनाट करण्यासाठी सतत दोन वर्षे अनेकविध उपाययोजना राबविण्यात आल्या. दोन वर्षांच्या या लढाईनंतर आज पाडव्याचा सण कोरोनामुक्तीची पहाट घेऊन आला आहे. मागील दोन महिन्यांत कोविड 19 च्या रूग्णांमध्ये दिसून आलेली शाश्वत व लक्षणीय घट लक्षात घेता कोविड 19 साथीच्या अनुषंगाने लागू निर्बंध काढून टाकण्यात आले आहेत. अमरावती जिल्ह्यातही तसा आदेश जिल्हा प्रशासनाकडून जारी करण्यात आला आहे. पुन्हा अशी साथ उद्भवू नये. सर्वांचे आरोग्य उत्तम राहो व सुखसमृद्धी लाभो, अशा शुभेच्छा पालकमंत्र्यांनी व्यक्त केल्या.
व्यक्तिगत व सामाजिक आरोग्याचे संरक्षण करण्याच्या हेतूने कोविड अनुरूप वर्तणूकीचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. कोरोनाकाळात अवलंबलेली स्वच्छता व सुरक्षिततेची सवय यापुढेही कायम ठेवून स्वत:सह सार्वजनिक आरोग्य जपूया, असे आवाहन त्यांनी केले.