नागपूर : एक एप्रिलपासून घर, फ्लॅट, प्लॅाट, दुकान खरेदीवर एक टक्का स्टॅम्प ड्युटी वाढणार आहे. त्यामुळे शेवटच्या दोन दिवसांत मुद्रांक शुल्क वाचवण्यासाठी अनेक जण खरेदीचे व्यवहार उरकून घेतायत. नागपुरात रजिस्ट्री कार्यालयात नोंदणीसाठी लोकांची गर्दी वाढलीय. सध्या घर, फ्लॅट, प्लॅाट, दुकान खरेदीवर सहा टक्के मुद्रांक शुल्क भरावा लागतोय. पण एक एप्रिलपासून त्यात एक टक्का वाढ होणार आहे. त्यामुळे नोंदणी कार्यालयात प्रॅापर्टी नोंदणी करणाऱ्यांची गर्दी वाढलीय. नागपुरात पूर्वीपेक्षा 20 ते 30 टक्के नोंदणी करणाऱ्यांचं प्रमाण वाढलंय. महाविकास आघाडी सरकारने मुद्रांक शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय मेट्रोच्या कामकाजासंदर्भात बांधकामे सुरू आहेत त्यांच्यासाठी आहे.
अधिभाराला नागरिकांचा विरोध
महाराष्ट्र सरकारने दस्तऐवज नोंदणी आणि तारण व्यवहारावर एक एप्रिलपासून मुद्रांक शुल्कावर एक टक्का अधिभार लावण्याचे आदेश दिलेत. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त बोजा वाढणार आहे. मेट्रो पूर्ण क्षमतेने सुरू होत नाही, तोपर्यंत एक टक्का अधिभार लावू नये, अशी मागणी नागरिक करत आहेत. 1 एप्रिलपासून मेट्रो शहरांमध्ये 1 टक्के मुद्रांक शुल्क वाढणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मुद्रांक शुल्काची रक्कम वाचविण्यासाठी मालमत्ता खरेदीतही झपाट्याने वाढ झाली आहे.
1 एप्रिलपासून महागणार थर्ड पार्टी विमा
वाहन विम्याचे एक एप्रिलपासून नवे दर लागू होण्याची शक्यता आहे. थर्ड पार्टी इन्सूरन्सच्या प्रीमियममध्ये वाढ होणार आहे. जवळपास 2 ते 5 टक्के दरवाढ वाहनाच्या इंजिन क्षमतेनुसार होणार आहे. यामुळे वाहनचालकाला जास्त पैसे मोजावे लागणार आहे. 1000 सीसीच्या कारसाठी 2072 रुपये विम्याचा हप्ता होता. मात्र आता तो 2094 होईल. त्यात वाढ होणार आहे. 1,500 सीसीच्या कारसाठी 3,221 ऐवजी 3,416 रुपये प्रीमियम भरावा लागणार आहे. 1500 सीसीच्या कारसाठी 7,897 रुपये प्रीमियम भरावा लागणार आहे. चारचाकी व दुचाकी दोन्हीवर विमा प्रीमियम वाढणार आहे. 350 सीसीपेक्षा जास्त वाहनासाठी प्रिमियम 2,804 रुपये भरावा लागणार आहे. दुचाकीच्या 150 सीसी ते 350 सीसी क्षमता असणाऱ्या दुचाकीसाठी 1,366 रुपये प्रीमियम द्यावा लागणार आहे.