पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्याच्या बहुतांश भागांत पुढील तीन ते चार दिवस सोसाटय़ाचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडय़ाच्या काही भागांत सोमवारी पावसाची शक्यता असून, उर्वरित महाराष्ट्रात मंगळवारपासून पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरामध्ये सध्या कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्यामुळे दक्षिणेकडील काही भागात पाऊस होतो आहे. दुसऱ्या बाजूला उत्तरेकडे पश्चिमी विक्षेपांची मालिकाच सुरू आहे. हिमालयीन विभाग आणि राजस्थानात वाऱ्यांची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. या सर्वाचा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे. मध्य महाराष्ट्रात ७ ते १० मार्च या कालावधीत पावसाची शक्यता असून, ९ मार्चपर्यंत सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. कोकण विभागात मुंबई आणि परिसरात हलक्या पावसाची शक्यता आहे. कोकणात इतर भागांत हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह सोसाटय़ाचा वारा वाहण्याची शक्यता आहे. मराठवाडय़ात ७ मार्चपासून सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पाऊस, तर विदर्भात ८ मार्चपासून विजांच्या कडकडाटात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत अंशत: ढगाळ वातावरणाची स्थिती आहे. त्यामुळे दिवसाचे कमाल तापमानात काही प्रमाणात घट होऊन उन्हाचा चटका घटला आहे. जवळपास सर्वच भागांतील कमाल तापमान सरासरीच्या जवळ आले आहे. मुंबई परिसर आणि कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात रात्रीचे किमान तापमान सरासरीपुढे आहे.
अंदाज काय?
कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यांत ८ आणि ९ मार्च, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांत ७ ते ९ मार्च, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत ८ आणि ९ मार्च, मराठवाडय़ातील औरंगाबादमध्ये ७ ते ९ मार्च, जालना, परभणी, बीड, हिंगोली जिल्ह्यांत ८ आणि ९ मार्चला सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांत ८ ते १० मार्चला विजांच्या कडकडाटात हलक्या पावसाची शक्यता आहे.