सातारा :
सातारा शहराचा हद्दवाढीमुळे विस्तार झाला आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या भागातील नागरिकांना पायाभूत सुविधा देण्यासाठी सुमारे 49 कोटींची आवश्यकता आहे. हा निधी मंजूर करावा, या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खा. छ. उदयनराजे भोसले यांनी पुण्यात भेट घेतली. यावेळी विकासकामांवर चर्चा झाली असली तरी या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सातारा शहराची हद्दवाढ झाल्यामुळे 29.19 चौ. कि.मी क्षेत्र झाले आहे. विकास कामांच्या अनुषंगाने हद्दवाढ भागाचा सर्वे करण्यात आला आहे. रस्ते, गटारे, पथदिवे या पायाभूत सुविधांसोबत खुल्या जागांचा विकास करणे आवश्यक आहे. या प्राथमिक सुविधा पुरवण्यासाठी पहिल्या टप्प्यातील कामांची अंदाजपत्रके नगरपालिकेने तयार केली आहेत. त्याची किंमत सुमारे 4,850 लाख इतकी आहे. वाढीव भाग हा मूळ भागाच्या तिप्पट आहे. त्यामुळे वाढीव भागातील सुमारे 60 हजार 373 लोकसंख्येला पायाभूत सुविधा पुरवणे नगरपालिकेस शक्य नाही. त्यामुळे नव्याने हद्दीत आलेल्या भागामध्ये प्राथमिक सोयी सुविधा पुरवण्यासाठी शासनाच्या संबंधित विभागाकडून अनुदान प्राप्त होते. त्या अंतर्गत सातारा नगरपालिकेस निधी मंजूर करावा, अशी मागणी अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.
यावेळी मुख्याधिकारी अभिजीत बापट हेही उपस्थित होते. दरम्यान, नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि खा. उदयनराजे भोसले यांच्या भेटीमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली.