चंद्रपूर दि. 26 सप्टेंबर : ब्रम्हपुरी, सिंदेवाही व सावली तालुक्यासाठी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकारामुळे आयसीआयसीआय बँक फाउंडेशनच्या वतीने तीन फिरते मोबाईल रुग्णालय नागरीकांच्या सेवेसाठी उपलब्ध झाले आहे. आठवडाभरात या फिरत्या मोबाईल रुग्णालयाद्वारे 1403 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. यात ब्रम्हपूरी तालुक्यातील 552 नागरीक, सिंदेवाही तालुक्यातील 488 आणि सावली तालुक्यात 363 नागरिकांचा समावेश आहे.ब्रम्हपुरी येथे आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज फिरत्या रुग्णालयाचे (मोबाइल क्लिनीक व्हॅन) पालकमंत्र्यांच्या हस्ते 17 सप्टेंबर रोजी लोकार्पण करण्यात आले होते. दुस-या दिवसापासून सदर तीनही फिरत्या रुग्णालयाद्वारे गावागावात जाऊन नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. आठवडाभरात 14 गावांमध्ये 1403 नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. यात ब्रम्हपूरी तालुक्यातील एकूण 552 जणांचा समावेश असून किराडी येथील 122 नागरिकांची तपासणी, चिकटबोर्डा येथील 88 जण, एकारा येथील 122, सेलदा येथील 29, मुरपार येथील 75 आणि सायगाव तुकूम येथील 116 जणांची तपासणी करण्यात आली. सिंदेवाही तालुक्यातील पवनचक येथील 82, पवनपार येथील 107, गुंजेवाही येथील 95, कोठा येथील 101, तांबेगाढी – मेंढा येथील 103 असे एकूण 488 तर सावली तालुक्यातील करोडा येथील 50, कोंदेकाल येथील 92, पेढगाव येथील 59, आरोली येथील 72 आणि जाम येथील 90 असे एकूण 363 जणांनी तपासणी करण्यात आली. फिरत्या मोबाईल व्हॅनमध्ये एक डॉक्टर, परिचारिका व हेल्पर उपस्थित असून ताप, सर्दी, खोकला, अंगदुखणे, मधूमेह व रक्तदाब तपासणी तसेच ॲन्टीजन तपासणी केली जाते.मोबाइल ट्रेकिंग सिस्टीम व ॲपचीही सुविधा:आयसीआयसीआय बँक फाउंडेशनच्या वतीने मेडिकेअर हेल्थ सर्व्हीसेस मार्फत या फिरत्या दवाखान्यामध्ये मोबाइल ट्रेकिंग सिस्टीम व ॲपचीही सुविधा विकसित करण्यात आली आहे. या सिस्टीममध्ये व्हॅनमधील स्वच्छतेसह दररोज होणाऱ्या तपासण्याचा तपशिल, व्हॅन किती किलोमीटर फिरते याचा तपशिल आहे. डॉक्टर-पेशन्ट ॲप हे देखील रुग्णांच्या उपयोगी पडणारे ॲप असून क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर व ॲप डाऊनलोड केल्यानंतर रुग्णांची सर्व माहिती भरल्यास सदर माहिती डॉक्टरांच्या मोबाइलवर जाते.