स्वरूप गिरमकर
ग्रामीण प्रतिनिधी शिरूर
शिरूर : हिवाळ्यात तुम्ही एखाद्या वस्तूला किंवा व्यक्तीला हात लावला तर अचानक एक झटका लागतो. पण, असं का होतं? याचा कधी विचार केला आहे का? हिवाळ्यात एखाद्याला स्पर्श केल्यावर चटकन झटका लागतो आणि ‘चट्ट’ असा आवाज येतो.आपल्यासोबत अनेकदा असं होतं; पण का होतं हे अनेकांना ठाऊक नसते.ज्यावेळी शरीरावर किंवा वस्तूमध्ये इलेक्ट्रॉन जमा होत असतात, त्यावेळी स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी तयार होते. हिवाळ्यात आपण सिंथेटिक किंवा कृत्रिम धाग्याचे कपडे अधिक वापरत असतो. सिंथेटिक कपड्यांमधील फायबरमुळे जास्त प्रमाणात इलेक्ट्रॉन जमा होतात. विजेचा झटका किंवा शॉक लागण्याचे कारण म्हणजे हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी, निस्तेज होते. त्यामुळे इलेक्ट्रॉन जास्त प्रमाणात एकत्र येतात. परिणामी, हिवाळ्यामध्ये जेव्हा आपण कुणालाही स्पर्श करतो किंवा हात मिळवतो, त्यावेळी आपल्याला विजेचा झटका लागल्यासारखे वाटते. जर तुम्हाला हे टाळायचे असेल तर त्वचा मॉयश्चरायझ ठेवा. यामुळे तुमच्या कपड्यांवर, त्वचेवर इलेक्ट्रॉन जमा होणार नाहीत. शक्य असेल तर हिवाळ्यात सिंथेटिक कपड्यांऐवजी कॉटनचे कपडे घाला. यामुळे इलेक्ट्रॉन जमा होण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे असा अचानक ‘शॉक’ बसण्याचे किंवा चटकन ‘चट्ट’ आवाज येण्याचे प्रकार कमी होतात!