निशांत मनवर तालुका प्रतिनिधी, उमरखेड
उमरखेड (दि.25 डिसेंबर)येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत एक दिवसीय कार्यशाळा उमरखेड तालुक्यातील नागापूर पळशी येथे आयोजित करण्यात आली.दरम्यान नागापूर पळशी येथील विविध उपक्रमांची राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी पाहणी केली.नागापूर येथील संकल्प ग्राम विकास अभियानाअंतर्गत सप्ताह राबविण्यात येतो.यंदा या अभियानाचे तेरावे वर्ष असून डिसेंबर महिन्यात संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथी व आप्पारावजी कुर्मे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येतात. स्वच्छता अभियान, विविध महाविद्यालयातील व शाळेतील विद्यार्थ्यांच्या भेटी, विविध स्पर्धा जनावरांचे आरोग्य शिबिर, सामान्य ज्ञान स्पर्धा, रांगोळी स्पर्धा असे विविध कार्यक्रम घेण्यात येतात.नागापूर ग्रामपंचायत ही स्मार्ट ग्रामपंचायत आहे. गावातील शाळेत स्मार्ट बोर्ड, विविध प्रकारच्या झाडांची लागवड तसेच गावातील स्मशानभूमी पाहण्यासारखी आहे. त्यात प्रामुख्याने सोलर पंप व त्यासोबतच गांडूळ खत निर्मिती प्रकल्प, छोटी नर्सरी, चांगल्या प्रकारचे रस्ते व सर्व प्राथमिक गरजा पुरवणारी साधने येथे उपलब्ध आहेत.गावात भव्य व स्मार्ट सभामंडप सुसज्ज केला आहे. ग्रामपंचायतमार्फत शासनाच्या विविध योजना राबविल्या जातात, त्याचा फायदा सर्व ग्रामस्थांना होतो.सर्व कामे ग्रामपंचायतद्वारे नियोजनबद्ध होत आहेत असे दिसून आले.गाव व ग्रामपंचायतबद्दल आणि विविध उपक्रमांची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य चितंगराव कदम यांनी दिली. त्यांच्या पुढाकार व मार्गदर्शनात सर्व ग्रामस्थांच्या मेहनतीने इथे या गावाला नंदनवनाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.या गावाला आपण सर्वांनी भेट देऊन यासारखे आपले गाव करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कदम यांच्या मार्गदर्शनात व संकल्पनेतून गाव भेटीचा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला.राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रशांत अनासाने व राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन स्वच्छ व सुंदर गावाची पाहणी केली.