संतोष भवर शहर प्रतिनिधी अंबड
शासकीय कार्यालय हे जनतेच्या सुविधेसाठी व कल्याणकारी योजनाची अंमलबजावणी करण्यासाठी असते.परंतु शासकीय पदावर नियुक्त होताना घेतलेल्या अनाभाखा या फक्त कागदावरच राहतात आणि मग आपल्या कर्तव्याच्या विसर पडत सुरू होतो तो शासकीय पदाचा माज. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अंबड तालुक्याचे अंबड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय होय. उपविभागाचे प्रशासकीय प्रमुख म्हणून महसूल गोळा करणे,कायदा व सुव्यवस्था राखणे विकासात्मक कामावर देखरेख ठेवणे आणि उपविभागातील विविध विभागाचे समन्वय साधने त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या व जनतेच्या शैक्षणिक कामकाजा बरोबरच महत्त्वपूर्ण कामकाजासाठी वैधानिक प्रमाणपत्र जारी करण्याचे कार्य उपविभागीय अधिकारी कार्यालय अंतर्गत होते. परंतु अंबड येथील सुस्त उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या गलथान व हलगर्जीपणाच्या कार्यप्रणालीमुळे विद्यार्थ्यांना त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेला नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. यात सर्वात जास्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला खीळ बसत असल्याचे गंभीर चित्र वारंवार दिसून येत आहे. सेतू सुविधा केंद्रातून रीतसर ऑनलाईन अर्ज करून देखील बेजबाबदार कर्मचारी व अधिकाऱ्यांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. फक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पुढे पुढे मिरण्यात व शासकीय योजनांच्या उद्घाटन सोहळ्यांमध्ये फोटो मध्ये झळकण्यापुरतेच आपले काम असल्याचे धन्यता मानत आहे. अंबड येथील उपविभागीय कार्यालयाच्या उदासीन बेजबाबदार कार्यप्रणालीस वरिष्ठांनी अंकुश लावणे गरजेचे असल्याची मागणी विद्यार्थ्यांबरोबरच पालक वर्गातूनही करण्यात येत आहे.