संतोष पोटपिल्लेवार
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी:- शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नगण्य भाव ही दरवर्षीची समस्या आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेचा मुद्दा ठरला तो म्हणजे शेतमालाचे भाव पडते. निवडणुकीदरम्यान शेतमालाच्या दरात वाढ झाली नाही आता निवडणुकीची धामधूम संपली तर सोयाबीनच्या दरात वाढ होईल काय? अशी चिंता शेतकऱ्यांना भेडसावत असून निवडणुकीदरम्यान शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार सोयाबीनला किमान ६ हजार रुपये हमीभाव देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. परिसरात कापूस पीक खर्चाच्या दृष्टीने परवडत नसल्याने येथील शेतकरी सोयाबीन पीक मुख्य
पीक म्हणून पेरतात. याहीवर्षी सोयाबीनचा पेरा कापूस पिकाच्या तुलनेत जास्त असून भाव मात्र २ हजार ते ४ चार हजार पर्यंत नगण्य असल्याने
पंतप्रधानांनी निवडणूक काळात सोयाबीनला सहा हजार रुपये हमीभाव देण्याचे जाहीर केले होते. आता महायुतीचे सरकार सुद्धा बहुमतात निवडून आले. त्या अनुषंगाने त्यांनी आपले आश्वासन पूर्ण करून आम्हा शेतकऱ्यांच्या सोयाबीनला ताबडतोब सहा हजार रुपये हमीभाव द्यावा, अशी मागणी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. शासनाने यावर्षी सोयाबीनला ४ हजार ८९२ रुपयाचा हमीभाव जाहीर केला होता. परंतु लागवड खर्चाच्या तुलनेत हा भाव समाधानकारक नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे असून खाजगी व्यापारी शेतकऱ्यांची सोयाबीन सर्रास दोन हजार रुपये भावाने खरेदी करत आहे. तर अनेक शेतकऱ्यांना ४८९२ रुपयाचा भाव पदरात पाडून घेण्यासाठी सोयाबीन हमीभाव केंद्रावर न्यावी लागत आहे. तिथे गेल्यानंतरही एक ना अनेक अटींची पूर्तता केल्यानंतर सोयाबीन घेतले जाते. त्यामुळे बहुताश शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्राकडे न जाता सोयाबीन खाजगी व्यापाऱ्याकडे विकली जात आहे. परंतु खाजगी व्यापारी शेतकऱ्यांच्या मजबुरीचा फायदा घेत सोयाबीनचे भाव पाडून २ ते अडीच हजार रुपये भावाप्रमाणे शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी करत आहे. त्यामुळे स्पष्ट बहुमत मिळाल्याने व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आश्वासनानुसार महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देऊन आपले आश्वासन पूर्ण करावे, अशी मागणी सोयाबीन उत्पादक शेतकरी करीत आहे.