संजय डोंगरे
ग्रामीण प्रतिनिधी माना
खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेले म्हणजेच सोयाबीन पिक आहे. यावर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीनचे पीक शेतकऱ्याच्या हातातून गेले आहे. शेतकऱ्यावर एक प्रकारे “अस्मानी व सुलतानी संकट” आलेले आहे. उत्पादन कमी व खर्च जास्त,अशी काहीशी अवस्था ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची झालेली आहे. गेल्या सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात, जास्त प्रमाणात पाऊस पडल्यामुळे सोयाबीन पिकांची नासाडी झालेली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची कापणी झाली नव्हती. यावर्षी मजुरीत सुद्धा भरपूर वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले होते. सोयाबीन काढणाऱ्या मशीनचे दर सुद्धा गगनाला भिडले होते.इकडे शेतकऱ्यांच्या सोयाबीन मालाची किंमत फारसी पाहिजे तशी नव्हती. शासनाचे हमीभाव दर रु. ४८९० एवढे जाहीर केले होते. परंतु येथील व्यापाऱ्यांनी पाहिजे तसा भाव शेतकऱ्यांच्या मालाला दिला नाही. इथे शेतकऱ्यांचा कुणी कैवारी नाही. त्यामुळेच इथला शेतकरी देशोधडीला लागला आहे. परिणाम स्वरूप शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत. शेतकऱ्यांमध्ये एकी नसल्यामुळे इथले व्यापारी व सरकार शेतकऱ्यांचा गैरफायदा घेत आहेत. शासन स्तरावर शेतकऱ्यांसाठी अनेक उपाययोजना होत आहेत. तरी देखील त्याचा शेतकऱ्यांना काहीही फायदा होत नसल्याचे पाहावयास देखील मिळत आहे.त्यामुळे “शेतकरी उपाशी व व्यापारी तुपाशी”.असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. शासनाने शेतकऱ्याला तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्याच्या तोंडाला एक प्रकारे पाने पुसलेली आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. व अन्नदाता देखील आहे. तरी या बळीराजाची किंमत अधोरेखित केल्याशिवाय जमणार नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांना शासन स्तरावर बळ मिळणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे असेच हाल सुरू राहतील. त्यामुळे हा फार चिंतनाचा विषय आहे. याचे फार गंभीर असे परिणाम समाजाला व परिणामी जगाला भोगावे लागतील. त्यामुळे शेतकरी हा जगलाच पाहिजे नसून तो टिकला सुद्धा पाहिजे. असे आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. अन्नदाता शेतकऱ्याला चांगले दिवस येवो हीच आमच्या प्रतिनिधी कडून शुभेच्छा.