मकरंद जाधव
तालुका प्रतिनिधी श्रीवर्धन
राज्यात २० नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासना कडून निवडणूक विभागाच्या वतीने विशेष प्रयत्न केले जात आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत ज्या मतदारसंघात पन्नास टक्केपेक्षा कमी मतदान झाले आहे अशा ठरावीक मतदान केंद्र परिसरात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदानाबद्दल व्यापक जनजागृती करण्यात येत आहे.
त्याअनुषंगाने गुरुवार दि.७ नोव्हेंबर रोजी श्रीवर्धन तालुक्यातील दांडगुरी येथे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी १९३ श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ तथा तहसीलदार श्रीवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली कमी झालेला मतदानाचा टक्का वाढवण्याबाबत जनजागृती करण्यात आली.मतदान करणे ही सुद्धा एक देशसेवाच आहे.भारतीय संविधानाने प्रत्येक व्यक्तीला दिलेला मतदानाचा पवित्र हक्क बजावून लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी व एक सार्वभौम शक्तीशाली लोकशाही राष्ट्र उभारण्यास आपलं मतदानाच्या स्वरुपात सहकार्य करावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं.याप्रसंगी गट शिक्षण अधिकारी रमेश चव्हाण,सरपंच नेहा महाडिक,उपसरपंच शांताराम मोहित,ग्राम पं. सदस्य,ग्राम महसूल अधिकारी प्रदीप देवकांत,दांडगुरी प्राथ. शाळा केंद्रप्रमुख सुशांत येसवारे, पोलीस पाटील गायत्री शेलार, गाव अध्यक्ष प्रमोद पवार,मुंबई ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष विजय सावंत,वसंत कदम,अंगणवाडी सेविका,आशा सेविका,रेशन दुकानदार आणि ग्रामस्थ उपस्थित होते.