सार्वजनिक बांधकाम विभाग उमरखेड गुणवत्ता तपासणार का ?
अजीज खान
शहर प्रतिनिधी ढाणकी
आकोली-मन्याळी पांदण रस्त्यावरील पुलाची गुणवत्ता ही प्रश्नांच्या घेऱ्यात असल्याचे वृत्त, नुकतेच चार दिवसांपूर्वी आमच्या दैनिक महासागर वृत्तपत्रात प्रकाशीत करण्यात आले होते.
सदर पुलाच्या बांधकामात खाली कुठलाही बेड न टाकता, बंबू टाकून त्यावर सिमेंट पूल बनविण्यात आला. बंबू सुद्धा फुटक्या अवस्थेत होते. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यास विचारणा केली असता, सदर काम गुणवत्तापूर्ण झाले असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे होते.सदर पुलाच्या कामासाठी खासदार निधीतून दहा लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे कळते. परंतु प्रत्यक्ष पुलाचे काम बघितले असता दहा लाख या पुलाच्या बांधकामास लागलेच नसल्याचे आकोली येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
मग सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सदर पुलाच्या बांधकामाच्या ठेकेदारास पाठीशी का घालत असावेत ? याचा अर्थ अधिकाऱ्यांमध्ये व ठेकेदारांमध्ये काही आर्थिक देवान घेवान तर नाही ना ? असा प्रश्न निर्माण होत आहे.
कारण रविवारी झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसात सदर पुलाच्या बंबूला मोठ्या प्रमाणात कचरा अडकलेला आढळून आला. यावरून सदर पुलाच्या बांधकामाचे तीन तेरा वाजलेले आपल्याला पाहायला मिळेल. आणि सदर पुलाची गुणवत्ता किती निकृष्ट दर्जाची असेल ? हेही आपल्या लक्षात येईल.सदर पुलाच्या बांधकामाची गुणवत्ता सार्वजनिक बांधकाम विभाग उमरखेड कधी तपासणार ? निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारास प्रशासन काळ्या यादीत टाकणार का ? असा सवाल नागरिक करताना दिसत आहेत.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)