दिपक गोसावी
तालुका प्रतिनिधी तळोदा
मोरवड येथील अक्षय पाटील हा सामान्य कुटुंबातील एक युवक स्वतःकडे बऱ्यापैकी शेती त्याचबरोबर पदवी पर्यंत शिक्षण झालेले. वडील शेतकरी, काका शेतकरी.त्यामुळे शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून घराचा उदरनिर्वाह भागविणारे हे कुटुंब. त्यात अक्षय पाटील यांच्या काकांना अचानक कॅन्सर झाल्याने व या कॅन्सरचे निदान करताना डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले की,हा कॅन्सर सतत पोटात गेलेल्या विविध प्रकारच्या रसायनामुळे झालेला आहे. ही बाब अक्षय पाटील यांच्या लक्षात आल्याने त्यांनी या गोष्टीच्या मुळापर्यंत जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्या निदर्शनास आले की,आपण जो काही भाजीपाला अन्न म्हणून खातो आहोत हा भाजीपाला पिकवताना बऱ्याच प्रमाणात रासायनिक फवारणी ही केली जाते. त्याचबरोबर खत म्हणून रासायनिक खते दिली जातात. त्याचा परिणाम म्हणून आपल्याही पोटात रसायनच आत मध्ये जात असल्याकारणाने हे रसायन आपल्या शरीराला हानिकारक आहे. त्यामुळे ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी अशा लोकांना तात्काळ कॅन्सर होत आहे.आणि हे जगातील सर्वेक्षणातून संशोधनातून सिद्ध झाले आहे. त्यानंतर या युवकाने मनातून ठरवले की आता यापुढे आपल्या शेतातून उत्पन्न जरी कमी आले तरी चालेल परंतु आपल्या शेतातील काही क्षेत्र हे सेंद्रिय भाजीपाल्यासाठी या ठिकाणी राखून ठेवावे .त्या दृष्टीने त्यांनी तळवे ते मोरवड या गावानजीक आपली शेती जी तळोदा,बोरद रस्त्याला लागून आहे अशा आपल्या काही क्षेत्रांमध्ये सेंद्रिय पद्धतीने भाजीपाल्याची लागवड केली. त्यात गिलकी, दोडकी, भेंडी, गवार त्याचबरोबर शेपू पालक यांची शेती केली. ही लागवड झाल्यानंतर त्यांच्यापुढे सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झाला तो या पिकांना वाढ कशी द्यावी? पिकाची वाढ होणेकामी आपल्याला काय काय साहित्य लागेल किंवा कुठल्या प्रकारचे जिवाणू वापरावे लागतील. कोणते खत वापरावे लागेल. या संदर्भात त्यांनी युट्युब च्या माध्यमातून संशोधन करण्यास सुरुवात केली. अनेक ठिकाणी अनेक चॅनेलच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीचे प्रयोग पाहिले तेव्हा त्यांना असे निदर्शनास आले की, सेंद्रिय शेती करत असताना गाईचे गोमूत्र, त्याचबरोबर गाईच्या दुधापासून निर्मित ताक, तसेच पंचगव्यापासून निर्मित शेणखत.फवारणीसाठी निंबोळी अर्कापासून निर्मित द्रावण याचा उपयोग केल्याने सेंद्रिय शेती ही फुलत असते. त्यामुळे त्यांनी आपल्या या शेतीत रासायनिक खता ऐवजी सेंद्रिय खतांना प्राधान्य दिलं. आणि त्या माध्यमातून ते आता बऱ्यापैकी भाजीपाल्याचे उत्पन्न घेऊ लागले आहेत. त्यांच्या शेतात रोज सायंकाळी ५ वाजेला छोटी दुकान त्या लावलेली असते. येणारे जाणारे वाटसरू,प्रवाशी त्यांच्या दुकानावर येऊन थांबतात आणि सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या भाजीपाला त्या ठिकाणाहून खरेदी करतात हा भाजीपाला चवीला उत्तम असून कुठल्याच प्रकारचे हानिकारक रासायनिक फवारणी याच्यावर नसल्याने लोकंही आवर्जून हा भाजीपाला खरेदी करत असतात. परंतु सध्या दीड एकर क्षेत्रामध्ये हा भाजीपाला लागवड झाल्यामुळे हा भाजीपाला लोकांसाठी पुरेसा होत नाही. त्यामुळे भविष्यात अजून याच्यामध्ये बदल करून जास्तीचे क्षेत्र या ठिकाणी लावण्यात येईल असा ही त्यांचा पुढील दृष्टिकोन आहे.
“मी एक साधारण युवक असून मी या क्षेत्रात न येता दुसऱ्या क्षेत्राकडे वळणार होतो परंतु हल्लीचे युग पाहता मला या क्षेत्रामध्ये यावं लागलं आणि या क्षेत्रामध्ये पुढे उत्तम भविष्य असल्याचे जाणून मी सेंद्रिय भाजीपाला लागवडीत स्वतःला झोकून दिले पहिलाच प्रसंग असल्यामुळे काही चुका माझ्याकडून या ठिकाणी झालेल्या आहेत परंतु त्या आता माझ्या निदर्शनास आल्यामुळे भविष्यात सेंद्रिय पद्धतीने जास्तीत जास्त उत्पन्न कसे घेता येईल याकडे मी अधिकच लक्ष देणार आहे त्याचबरोबर परिसरातील शेतकऱ्यांनाही माझे आवाहन आहे की तुम्हीही सेंद्रिय शेतीकडे वळावे कारण भविष्यात सेंद्रिय शेती वाचून पर्याय नाही कारण जर आपण रासायनिक खतांचा भाडिमार आणि फवारणी करत राहिलो तर शेतीही आपल्याला पाहिजे तेवढा उत्पन्न देणार नाही आणि आपण आपल्या शरीराचा ऱ्हास करून बसू.
अक्षय पाटील
युवा शेतकरी मोरवड ता.तळोदा.”
“मला नोकरीनिमित्त रोज तळोदा येथून बोरद येथे जावे लागते.त्यामुळे जसं लोकांना भाजीपाल्याची गरज असते तशी मलाही आहे.एके दिवशी रस्त्याने जात असताना ऑरगॅनिक फार्म बाबत जाणून घेतले आणि या ठिकाणी उत्तम प्रतीचा सेंद्रिय भाजीपाला मिळतो हे निदर्शनास आल्यामुळे मी संध्याकाळी माझ्या नोकरीच्या ठिकाणाहून परत येत असताना आवर्जून या ठिकाणी थांबतो. आणि मला पाहिजे तो भाजीपाला या ठिकाणी खरेदी करतो घरी आणल्यानंतर जेवणाच्या वेळी या भाजीपाल्याची चव बाजारातील भाजीपाल्या पेक्षा वेगळीच असते.ती घरात सगळ्या हवी हवी शी वाटते. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा भाजीपाला शरीराला हानिकारक नसल्याने यापुढे मी तो आवर्जून खरेदी करतो.
अशोक मराठे
तळोदा ता.तळोदा जि. नंदुरबार.”