आकाश बुचुंडे
ग्रामीण प्रतिनिधी मारेगाव
मारेगाव : वणी तालुक्यातील बोर्डा येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजु उंबरकर यांनी गावभेटी दरम्यान गावातील कुमारी तेजस्विनी सतीश नक्षिने या मुलीचे २ वर्षापूर्वी कोरोना काळात आई वडीलांचे निधन झाले असुन सद्या ती अनाथ झाली असल्याची माहिती गावातील एका महिलेने दिली. ही माहिती मिळताच राजु उंबरकर यांच्यातील बाप जागा होवुन तेजस्विनीला बोलावून घेतले आणि विचारपुस केली असता घरात थकलेल्या परस्थितित असणारे आजी आजोबा शिवाय तिला कोणीच नसल्याने आजोबाला मिळणाऱ्या तुटपुंजी पैशातून घर खर्च व आपल्या शिक्षणाचा खर्च भागवीत असुन ती सध्या १२ वीत शिकत आहे. १२ वी झाल्या नंतर पोलिस व्हायचं तीच स्वप्न आहे. मात्र ज्या आई वडिलांच्या भरवशावर तिने पोलिस बनण्याचे स्वप्न पाहिले त्यांनाच काळाने हिरावुन नेल्याने आपले हे स्वप्न स्वप्नच राहणार असल्याची खंत बोलुन दाखवताना तिचे पाणावले डोळे पाहून राजु उंबरकर यांना गहिवरून आले. व त्यांनी क्षणाचा ही विलंब न करता. “आजपासून तुझा बाप राजु उंबरकर” असे उदगार काढून तेजस्विनीच्या संपुर्ण शिक्षणाची आणि भविष्याची सर्व जबाबदारी उचलली. तिला तिच्या ध्येया पर्यंत नेण्याचं काम माझं आहे. असा विश्वास दिला. उंबरकरांचे हे शब्द कानी पडताच त्या ठिकाणी उपस्थित असलेले कार्यकर्ते, संपूर्ण गावकरी भावुक झाले. उपस्थित महिला तर अक्षरशः धायमोकळून रडल्या.
“तुका म्हणे जे जे भेटे|ते ते वाटे मी ऐसे|
विश्वास तो खरा मग |पांडुरंग कृपेचा|
या तुकाराम महाराजांच्या अभंगा प्रमाणे राजु उंबरकर यांनी अनाथ तेजस्विनीचे पालकत्व स्वीकारून तिच्या संपुर्ण शिक्षणाचा खर्च उचलुन पुन्हा एकदा आपल्यातील बाप माणसाचा प्रत्यय दाखवुन दिला आहे. त्यांच्या या भुमिकेचे समाजातील सर्वच स्तरांतुन स्वागत होत आहे.
यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शिवराज पेचे, अजिद शेख, अमोल ताजने, लक्ष्मण उपरे, पुरुषोत्तम दुमोरे, प्रणय गौरकर, योगेश झाडे यांच्या सह गावांतील गावकरी उपस्थित होते.