दिनेश आंबेकर
तालुका प्रतिनिधी जव्हार
खोडाळा : मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग आयोजित ५६ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत गिरीवासी सेवा मंडळ, कल्याण संचलित मुरलीधर नानाजी मोहिते गुरुजी महाविद्यालय खोडाळा-जोगलवाडी या महाविद्यालयातील विज्ञान तृतीय शाखेतील विद्यार्थी दीपक फसाळे याने ऑन दी स्पॉट पेंटिंग स्पर्धेत ब्राँझ पदक पटकवले असून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.कॉलेज विश्वातील महत्त्वाच्या महोत्सवांपैकी एक म्हणजे मुंबई विद्यापीठाचा युवा महोत्सव. ५६ व्या युवा महोत्सवाच्या स्पर्धांची अंतिम फेरी चर्चगेट येथील विद्यापीठ विद्यार्थी भवन येथे नुकतीच पार पडली. युवा महोत्सवाची विभागीय फेरी पार करून अंतिम फेरीत आव्हान कायम ठेवलेल्या दीपक फसाळे याला शहरी भागातील नामवंत महाविद्यालयांतील तब्बल ४२ स्पर्धकांचा सामना करून तिसरे स्थान मिळवत ब्राँझ पदक मिळविले. गेल्या दहा वर्षांपासून मोहिते महाविद्यालय मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेत आहे. मात्र, आतापर्यंत फक्त विभागीय फेरीपर्यंतचं समाधान मानावे लागत होते. मुंबईतील व्यावसायिक स्पर्धमध्ये भाग नोंदविणाऱ्या स्पर्धकांच्या तुलनेत अपुरे पडत होते. मात्र, दीपक फसाळे याने ही आव्हाने पार करत महाविद्यालयाला ब्राँझ पदक मिळवून देत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.प्राचार्य डॉ अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिते महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाने लोकनृत्य तारपा, पोस्टर मेकिंग आणि मेहंदी या तीन स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते. या महोत्सवात महाविद्यालयाने तीन पैकी तीनही इव्हेंटमध्ये विभागीय फेरी यशस्वीरित्या पार केली आहे. या यशाचे कौतुक गिरीवासी सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ चंद्रमणी मोहिते, सचिव दीपक कडलग यांनी केले असून संपूर्ण खोडाळा परिसरात कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रवर्तन काशीद यांनी विद्यार्थ्यांवर परिश्रम घेऊन यश संपादन केले असून युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीतही मोहिते महाविद्यालयाचा डंका वाजविला आहे.