अरविंद बेंडगा
तालुका प्रतिनिधी तलासरी
तलासरी : आपल्या भारत देशाच्या आजादी का अमृत महोत्सव निमित्त अतिशय मानाचा समजला जाणारा संगीत नाटक अकादमीचा अमृत पुरस्कार2023 वितरण सोहळा नवी दिल्ली येथील विज्ञान भवनामध्ये संपन्न झाला.भारताचे महामहीम उपराष्ट्रपती श्री. जगदीप धनखड यांच्या शुभहस्ते संगीत व नाट्य क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या भारतातील विविध राज्यातील 84 ज्येष्ठ कलावंतांचा यथोचित सन्मान करण्यात आला. त्यांपैकी आपल्या पालघर जिल्ह्यातील जव्हारच्या वाळवंडा गावाचे भूषण असलेले मागील वर्षीचा अमृत पुरस्कार विजेते, सुप्रसिद्ध तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा यांना आदिवासी संगीताचा शिरोमणी असलेला तारपा वादनमध्ये बहुमोल योगदान दिल्याबद्दल संगीत क्षेत्रातील अमृत पुरस्कार 2023 देऊन सन्मानित करण्यात आले. भिकल्या धिंडा यांनी तारपा ही वादनकला मागील 70 वर्षांपासून अगदी मनापासून जपली असून तिची साधना केलेली आहे. त्यांना आदिवासी समाजाच्या जीवनात तारपा वाद्याचे महत्व याची परिपूर्ण माहिती असून आज प्रत्येक आदिवासी बांधवांनी ती समजून घेऊन त्याच्या जोपासणेसाठी प्रयत्न करणे अतिशय गरजेचे आहे..या अमृत पुरस्काराचे स्वरूप अमृत सन्मानचिन्ह, रु एक लाख धनादेश, प्रमाणपत्र, समरणिका असे आहे. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाल्याने मा. प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी साहेब यांच्या आवाहनान्वये संपूर्ण देश आझादी का अमृत महोत्सव साजरा करत आहे. त्याचेच औचित्य साधत ज्या ज्या कलावंतांनी वयाची 75 वर्षे पूर्ण केली आहेत अशा 84 ज्येष्ठ कलाकारांना या पुरस्काराने गौरविण्यात आले . या पुरस्कार आयोजन व वितरण कार्यात अर्जुन मेघवाल, कायदा व न्याय मंत्री भारत सरकार, मीनाक्षी लेखी, सांस्कृतिक व विदेश मंत्री आणि संध्या पुरेचा अध्यक्ष, संगीत नाटक अकादमी भारत सरकार यांनी विशेष योगदान देऊन उपस्थित जणांना मार्गदर्शन केले. भिकल्या धिंडा यांना पुरस्कार समारंभात सहभागी होण्यासाठी राजश्री शिर्के, सदस्य संगीत नाटक अकादमी व रवी बुधर, पदवीधर शिक्षक, जि प शाळा चौक यांनी मोलाचे योगदान दिले. ह्या पुरस्काराने संपूर्ण जव्हार तालुक्याची मान उंचावली असून भिकल्या लाडक्या धिंडा यांच्यावर पालघर जिल्हा व महाराष्ट्रातून अभिनंदन… कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांना पुढील निरोगी, आनंदी व दीर्घायुष्य यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा!