महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.१३:पहाटेच्या वेळेस एका कामगाराच्या घरात आढळलेल्या एका पाच फूट नागाला सर्पमित्रांनी सुरक्षितपणे पकडून त्याला जीवदान दिल्याची घटना शहरातील जैन मंदिर परिसरात नुकतीच घडली.या सापाला त्याच्या सुरक्षित अधिवासात निसर्ग मुक्त करण्यात आले आहे. जवळपास एक तास अंथरुणाजवळ असलेल्या या नागाने कोणालाही इजा न केल्याने मोठा अनर्थ टळला. शहरातील जैन मंदिरात सुरू असलेल्या कामासाठी येथे छत्तीसगढी मजूर आलेले आहेत. या मजुरांनी परिसरातच राहण्यासाठी कच्ची घरे उभारली आहे. अशात एका कामगाराच्या घरात पहाटेच्या वेळेस एका पाच फूट लांबीच्या अत्यंत विषारी नागाने प्रवेश केला. अंथरुणाजवळच फणा काढून त्याने आपले बस्तान बसविले. जाग आल्यावर घरातील लोक हा भला मोठा फणा काढलेला नाग पाहून घाबरले. मात्र प्रसंगावधान राखून त्यांनी याची माहिती सर्पमित्रांना फोन द्वारे दिली. माहिती प्राप्त होतात सर्पमित्र अमृत बावणे, सौरभ घोटेकर व साहिल घोटेकर हे घटनास्थळी पोहोचले व मोठ्या शिथापिने या नागाला पकडले. प्रथम या नागाची वनविभागात नोंद करण्यात आली व त्यानंतर या नागाला निसर्ग मुक्त करण्यात आले. मात्र जवळपास तासभर घरात ठाण म्हणून बसलेल्या या नागाने कोणाला इजा न केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.