संदीप टूले
तालुका प्रतिनिधी दौंड
मराठी पत्रकार परिषद संलग्न महाराष्ट्र सोशल मीडिया परिषद दौंड तालुका यांच्या वतीने यवत पोलीस स्टेशनला आज दिनांक 26 जुलै रोजी ‘महिला पत्रकाराला धमकी देणाऱ्या प्रवृत्तीवर धमकी प्रकरणी आणि पत्रकारावर संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबत’ निवेदन देण्यात आले व अशा प्रवृत्तीचा यावेळी सर्व पत्रकारानी निषेध व्यक्त करण्यात आला. समर्थ भारत माध्यम समूहाच्या संपादिका स्नेहा बारवे यांना आमच्या गावच्या खड्ड्यांवर आणि तमाशावर बातमी का बनवली, असे म्हणत रस्त्यात अडवून घातपात करण्याची आणि कार्यालयात घुसून तोडफोड करण्याची धमकी दिल्याप्रकरणी महाराष्ट्र सोशल मीडिया परिषद आक्रमक झाला असून. सोशल मीडिया परिषदच्या वतीने यवत पोलीस स्टेशनला निवेदन देत निषेध करण्यात आला आहे.
नारोडी (ता. आंबेगाव) गावातून नारोडी फाट्यापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून झालेल्या दुर्दशेवर समर्थ भारत माध्यम समूहातील SBP या वृत्तवाहिनीवर दि. २४ जुलै २०२३ रोजी एक वृत्त प्रसारित करण्यात आले होते. या वृत्तामध्ये गावातील पुढाऱ्यांना तमाशा भरविण्यासाठी आर्थिक तरतूद करता येते, मात्र रस्त्यांच्या दुर्दशेवर आणि इतर समस्यांवर लक्ष देण्यासाठी आर्थिक चणचण भासते, अशा आशयाचे भाष्य करण्यात आले होते.
हे वृत्त प्रसारित झाल्यानंतर गावातील काही पुढाऱ्यांनी समर्थ भारत माध्यम समूहाच्या संपादिका स्नेहा बारवे यांना प्रत्यक्ष भेटून आणि फोन करून धमकाविले. आम्ही आमच्या गावात काहीही करू, तुम्ही आम्हाला विचारणारे कोण? आम्ही तमाशा भरवू किंवा पैसे उधळू, तुम्हाला काय करायचं आहे? आम्ही तुम्हाला सोडणार नाही. आम्ही आमच्या गावातील महिलांना तुमची गाडी अडवून पाहून घेतील. तुम्हाला रस्त्याने जाऊ देणार नाही. तुमच्या कार्यालयात काही ठेवणार नाही. अशा पद्धतीने धमकी दिली.
समर्थ भारत माध्यम समूहाच्या संपादिका स्नेहा बारवे यांना नारोडी गावातील गावगुंडांनी आणि तमाशा शौकिनांनी दिलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र सोशल मीडिया परिषदच्या वतीने यवत पोलीस स्टेशन येथे अनेक पदाधिकारी जमले होते. दरम्यान यवत पोलीस स्टेशन येथे ठाणे अंमलदार मेघराज जगताप यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा प्रतिनिधि एम जी शेलार, दौंड तालुका पत्रकार संघ अध्यक्ष रविंद्र खोरकर, महाराष्ट्र सोशल मीडिया परिषद दौंड तालुका अध्यक्ष दिपक पवार, उपाध्यक्ष विनायक दोरगे, कार्याध्यक्ष संजय सोनावणे, सचिव राहुल अवचट, बाळासाहेब मुळीक, अनिल गायकवाड, संदीप भालेराव, संदीप सोनावणे, सुशांत जगताप, मनोज कांबळे आदि पत्रकार बांधव उपस्थित होते.


