प्रकाश नाईक
तालुका प्रतिनिधी अक्कलकुवा
अक्कलकुवा : राज्यातील दोन उमुख्यमंत्र्यांप्रमाणेच महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत मध्ये दोन उपसरपंच निवडीची तरतुद करण्यात यावी व त्याबाबतचे परिपत्रक काढून अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात यावेत असे निवेदन गणेश खर्डे राज्य उपाध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र राज्यात सद्या सरकारने आपल्या सोयीसाठी दोन उपमुख्यमंत्री निवडले असून, तशाच प्रकारे महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे सर्व ग्रामपंचायत मध्येही दोन उपसरपंच निवडण्याबाबत शासन स्तरावर तात्काळ विचार व्हावा. तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक गावा-गावातही अनेक गट असतात, त्या गटापैकीच अनेक जण ग्रामपंचायत सदस्य म्हणून वेगवेगळ्या पॅनेल मधून निवडून आलेले असतात. ग्रामपंचायत सदस्य झाल्यानंतर प्रत्येकालाच सरपंच किंवा उपसरपंच हे पद मिळावे अशी अपेक्षा सर्वांचीच असते. त्यातच सरपंचपद राखीव असले तर इतरांना म्हणजे सर्वसाधारण खुल्या सदस्यांना संधी मिळत नाही. त्यातून अनेक जण नाराज होतात, सदस्यांची फोडाफोडी होते व काही वेळा सदस्यांची पळवा पळवी देखील होते काही वेळा यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार देखील होतो त्यातूनच गाव पातळीवर मोठा तणाव निर्माण होऊन वाद विकोपाला जातो त्यामुळे दोन गटात भांडणे होतात व त्याचे दुष्परिणाम गावच्या विकासावर तर होतातच व गावात देखील राजकिय वातावरण दूषित होते. त्यामुळे शासनाने दोन उपमुख्यमंत्र्यां प्रमाणेच दोन उपसरपंच निवडण्याची तरतूद केली तर अनेक ग्रामपंचायत सदस्यांना पाच वर्षांच्या कालावधीत उपसरपंच होण्याची संधी मिळेल व सर्वांना आपल्या मर्जीप्रमाणे ग्रामविकसात योगदान देता येईल. यासंदर्भात शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन परिपत्रक काढावे व त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी गणेश खर्डे राज्य उपाध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी केली आहे.


