अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
मालेगांव : अकोला – नांदेड महामार्गाचे काम मागील तीन ते चार वर्षापासून युद्ध पातळीवर सुरू आहे.याच एक भाग म्हणून महामार्ग निमिर्ती साठी लागणारे साहित्य लोखंड आणि गौण खनिजे याची खूप मोठ्या प्रमाणावर वाहतूक सद्यस्थितीत या मुख्य रस्त्यावरून केली जात आहे.मात्र सुरुवातीपासूनच काम करणाऱ्या ठेकेदारांनी कंपन्यांनी त्यांना लागणारे गौण खनिजे हे अवैधरित्या उत्खनन केलेले व वाहतूक नियमांचे सरास उल्लंघन केलेले आपणास आजवर पहायास मिळाले आहे. हा प्रकार मात्र महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले तरी जसाच तसा सुरूच आहे. महामार्ग निर्मिती लागणारे वाळू,मुरूम, क्रश याचे वाहतूक हे राजरोसपणे व नियमबाह्य दिवसाढवळ्या केली जात आहे मात्र यावर महसूल प्रशासनाचे कसलेच लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. जागरूक व कर्तव्यदक्ष असलेला महसूल विभाग रेती व्यवसायिकांना त्यांच्या वाहनात गौण खनिज असल्यास इंच आणि सेंटीमीटरने मोजमाप करून जरा काही शिल्लक आढळल्यास त्यांना कसला विचार न करता लाखो रुपये दंड आकारण्यात येतो किंवा त्यांच्या वाहनाची जप्ती केली जाते.आणि महामार्गाच्या निर्मितीसाठी होत असलेले गौण खनिजांची वाहतूक ही या वाहनाच्या परवानापेक्षा जास्त केली जात आहे. मात्र याच्यावर आजपर्यंत कोणत्याच विभागाने कुठेच आणि कसलीच कारवाई केल्याचे दिसून आले नाही त्यामुळे मालेगाव तालुक्यातील जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.


