सय्यद रहीम रजा
तालुका प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड : कुरळी येथील नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी उमरखेड तहसील कार्यालयावर ग्रामस्थांचे उपोषण सुरु असून उपोषण सोडवीण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या अभियंता व अधिकाऱ्यांना यश आलं नाही. अमडापूर ता उमरखेड च्या जलस्रोताच्या नाल्यावरील मंजूर झालेल्या पुलाचे अर्धवट बांधकाम पूर्ण व्हावे या व इतर मागण्यांसाठी कुरळी ग्रामस्थ दिनांक 26 जुन पासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले असून आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. लघु पाटबंधारे विभागातर्गत येत असलेल्या अमडापूर लघु प्रकल्पाचे बुडीत क्षेत्रालगत असलेल्या कुरळी येथील नाल्यावर गावकऱ्यांच्या मागणीनुसार गाव रस्ता पुलाचे बांधकाम करारनामा क्र. बी 1/14/2009-10 नुसार कंत्राटदार संतोष चव्हाण रा धुंदी ता पुसद यांना देण्यात आले होते. परंतु पुलाचे बांधकाम अद्याप अपूर्ण असून पाटबंधारे विभागाने तात्काळ दखल घेऊन मजबूत पूल बांधावे तसेच रस्त्याचे काम पूर्ण करण्यात यावे, पुलाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत शेतकऱ्यांना वार्षिक प्रति एकर एकर एक लाख रुपये मोबदला देण्यात यावा किंवा नाल्याच्या पलीकडील सर्व शेतकऱ्यांची जमीन पाटबंधारे विभागाने संपादित करावी आदी मागण्या उपोषणाकर्त्यांच्या आहेत. उपोषणकर्त्यांमध्ये रामेश्वर भिवाजी पाटील, देवराव शिवाजी वठोरे, अभिलाष मल्हारी इंगोले, गंगाधर नथूजी पाटील, बालाजी माधव वाठोरे आदी आमरण उपोषणास बसले आहे.
चौकट :
पुरोगामी युवा ब्रिगेड चा चक्का जाम चा ईशारा
उमरखेड च्या पुरोगामी युवा ब्रिगेड ने उपोषण मंडपास भेट देऊन पत्राद्वारे जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले. उपोषणकर्त्यांच्या मागण्या येत्या 3 दिवसात पूर्ण नाही झाल्यास चक्का जाम करण्याचा ईशारा पुरोगामी च्या पदाधिकाऱ्यांनी दिला.


