पुणे : शहरामध्ये डासांपासून पसरणारा ‘झिका’ विषाणू चा रुग्ण आढळला आहे. बावधन येथील ६२ वर्षीय व्यक्तीस झिकाची लागण झाली होती. सध्या हा रुग्ण पूर्णपणे बरा झाला असून कोणतेही लक्षणे नाहीत. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून पुणे शहर तसेच बावधन परिसरात ताप रुग्ण सर्वेक्षण अधिक वेगवान करण्यात आले आहे. पुण्यातील एका खासगी प्रयोगशाळेत १८ नोव्हेंबरला हा रुग्ण झिका बाधित असल्याचे निदर्शनास आले, त्यानंतर दि. ३० नोव्हेंबरला एनआयव्हीच्या तपासणीत हा रुग्ण झिका बाधित आल्याचे सिद्ध झाले आहे. दरम्यान हा रुग्ण जहांगीर रुग्णालयात ताप, खोकला, सांधेदुखी आणि थकवा या कारणांसाठी बाह्यरुग्ण विभागात सल्यासाठी आला होता. हा रुग्ण मूळचा नाशिकचा असून दि.६ नोव्हेंबर रोजी पुण्यात आला होता. त्यापूर्वी हा रुग्ण सुरतला जाऊन आला असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. महापालिकेच्यावतीने बावधन भागात रोग नियंत्रण उपाययोजना केल्या आहेत. रुग्णाच्या परिसरातील घरांचे सर्वेक्षण करण्यात आले मात्र त्यात एकही संशयित रुग्ण आढळला नाही. या भागात डासोत्पत्तीसाठी घरोघर सर्वेक्षण, कंटेनर सर्वेक्षण करण्यात आले. या भागात एडीस डासाची उत्पत्ती आढळून आलेली नाही.
झिका हा डेंग्यू, चिकुनगुनिया या डासांपासून एकापासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरणारा विषाणू आहे. याची बाधा गरोदर महिलांना झाल्यास जन्माला येणाऱ्या मुलांवर त्याचा परिणाम दिसतो. यामुळे मेदूंची वाढ अपुरी होते. यामध्ये मुलांचे डोके प्रमाणापेक्षा लहान होणे, त्याला गुलियन बॅरे सिंड्रोम होणे, मज्जातंतूविषयक आजार होणे ही लक्षणे दिसू शकतात. डोळे लाल होणे, प्रचंड डोकेदुखी, ताप ,सांधेदुखी,अंगदुखी, डोकेदुखी, उलटी होणे, अस्वस्थता जाणवणे इत्यादी लक्षणे दिसतात. ज्या लोकांना या विषाणूने ग्रासले आहे त्यांनी आराम करणे गरजेचे आहे. याच्या लक्षणांमध्ये शरीरावर लाल रंगाचे चट्टेही दिसतात.