नगर : भारतात दरवर्षी १ डिसेंबर ते ७ डिसेंबर दरम्यान जागतिक एडस सप्ताह साजरा केला जातो. या सप्ताहात एड्स विषयी समज-गैरसमज, त्यामुळे समाजात वावरताना लागणारा कलंक, एड्स बाधित व्यक्तींसोबत केला जाणारा भेदभाव, एड्स सोबत जीवन जगणाऱ्या व्यक्तींचे हक्क व अधिकार आणि त्यांची सामाजिक प्रतिष्ठा याबाबत जनजागृती करणारे विविध उपक्रम, व्याख्याने आदीचे आयोजन केले जाते. शून्य गाठायचे आहे या ब्रीदवाक्यानुसार एड्स संबंधित विविध उपक्रमाचे आयोजन स्नेहालय संस्थेने केले आहे. स्नेहालय संस्था, जिल्हा रुग्णालय, जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभाग आणि ए. आर. टी. विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. १ डिसेंबर २०२२ रोजी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कंडोमचे मोफत वाटप, घोषवाक्य आणि माहितीपत्रके वाटून एड्सबाबत असणारे समज -गैरसमज दूर करण्यात येणार आहे.
शुक्रवार दि. २ डिसेंबर २०२२ रोजी एड्स संसर्गीत लोकांसाठी राज्यस्तरीय वधू – वर. परिचय मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. एच. आय. व्ही. एड्स संसर्गीतांच्या मनातील घुटमळता काढण्यासाठी आणि त्यांचे जीवन सुकर होण्याकरिता परिचय मेळाव्याचे आयोजन केले जाते.या मेळाव्यासाठी स्वामींनी महिला पतसंस्थेचे संचालिका प्रतिभा गांधी, प्रेक्षाध्यान व योगा प्रशिक्षक, गुजरातचे अलका मेहता, ए. आर. टी. विभागाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम पानसंबळ, जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शनिवार ३ डिसेंबर रोजी देह व्यापारातील बळी महिलांकरिता सबलीकरण-सक्षमीकरण-पुनर्वसनासाठी वीर रणरागिणी मेळाव्याचे आयोजन नगर व श्रीरामपूरला केले आहे.मंगळवार ६ डिसेंबर रोजी एच. आय. व्ही. एड्स संसर्गीतांसाठी आरोग्य काळजी, उपचार आणि शासकीय योजनाबाबत मार्गदर्शन शिबीर डॉ. सुरेश घोलप यांच्या उपस्थित आयोजित केले आहे. बुधवार दि. ७ डिसेंबर रोजी महिला तमाशा कलावंत यांच्यामध्ये सकारात्मक विचार रुजविण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. रविवार दि. ४ डिसेंबर रोजी समलिंगी संबंध करणाऱ्या पुरुषांसाठी हक्क, अधिकार आणि कायदेविषयक ज्ञान देण्यासाठी “गुलाबी मेळाव्याचे” आयोजन शेवगाव येथे करण्यात आले आहे. सोमवार दि. ५ डिसेंबर रोजी तृतीयपंथी यांच्या हक्क व कर्तव्यबाबत “आक्रोश मेळावा” श्रीरामपूर येथे आयोजित करण्यात आले आहे.