पिंपरी : मुलाला शाळेत सोडण्यासाठी चाललेल्या आईच्या दुचाकीला मोटारीची धडक बसली. यामध्ये आई व मुलगा दोघेही दुचाकीवरून खाली पडले. त्या वेळी बाजूने चाललेल्या एका ट्रकच्या मागील चाकाखाली मुलगा चिरडला गेला. आईच्या डोळ्यांदेखत पोटच्या गोळ्याने तडफडून जीव सोडला. ही हृदयद्रावक घटना गुरुवारी (दि. 24) सकाळी शाहूनगर येथे घडली. अथर्व रवींद्र आळणे (11, रा. एमआयडीसी भोसरी) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. अथर्व हा पिंपरी येथील प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता सहावीच्या वर्गात शिकत होता. शाहूनगर येथील जुन्या आरटीओ कार्यालयाजवळ त्यांच्या दुचाकीला मोटारीची धडक बसली. त्यामुळे दुचाकीवर असलेल्या हर्षदा या रस्त्याच्या एका बाजूला त्यांच्यामागे बसलेला अर्थव दुसर्या बाजूला पडला. त्या वेळी बाजूने जात असलेल्या ट्रकच्या मागच्या चाकाखाली अथर्व आला. या अपघातात हर्षदा किरकोळ जखमी झाल्या आहेत. डोळ्यादेखत मुलगा तडफडत असताना आई हर्षदा यांनी जोरात हंबरडा फोडला. आई जखमी तर मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून रस्त्याने जाणार्या नागरिकांनी मोठी गर्दी केली. याप्रकरणी ट्रकचालक आणि चारचाकी चालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.